समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे; लातूर जिल्ह्यातील १७० उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत
By हरी मोकाशे | Published: October 30, 2023 06:11 PM2023-10-30T18:11:29+5:302023-10-30T18:11:36+5:30
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन
लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गतचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना सहभागी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १७० उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पाच- सहा वर्षांपासून ग्रामीण भागात समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवा देत आहेत. कोविड काळात स्वत:ची आणि कुटुंबाची पर्वा न करता झोकून देऊन काम केले. तसेच शासनाच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य सुविधा पुरवित आहेत. मात्र, ते कंत्राटी असल्याने ते शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे बदली, अनुभव बोनस, बढती, महागाई भत्ता असे प्रश्न प्रलंबित आहेत.
केंद्र शासनाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेकडूनही सातत्याने मागणी होत आहे. मात्र, शासन दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्यात आले.
काम बंद आंदोलनासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांना महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी गोडगे, सचिव डॉ. सविता भारती, कोषाध्यक्ष डॉ. अजित पाटील यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
उपकेंद्रातील १२ सेवेवर मोठा परिणाम...
उपकेंद्रातून गरोदर माता व बालकांना सेवा, असंसर्गजन्य आजार सेवा, संसर्गजन्य आजाराची तपासणी व सेवा, कुटुंब नियोजन, सामान्य आरोग्यसेवा अशा एकूण १२ प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील १७० उपकेंद्रातील या सुविधा ठप्प झाल्या आहेत, असे महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी गोडगे यांनी सांगितले.