सार्वजनिक सुटीच्या दिवशीही अधिकारी, कर्मचारी कार्यमग्न; लातूर जिल्हा परिषद का गजबजली?
By हरी मोकाशे | Published: March 8, 2024 06:19 PM2024-03-08T18:19:11+5:302024-03-08T18:19:25+5:30
शनिवार, रविवारीही कार्यालय राहणार सुरु असल्याची माहिती
लातूर : येत्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने आणि वर्षअखेरीचा मार्च महिना असल्याने विविध योजना, विकास कामांसाठीचा प्राप्त निधी मुदतीत वापरला जावा. कुठलेही काम रखडू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सार्वजनिक, साप्ताहिक सुटी असली तरी कार्यालय सुरु ठेवून नियमित कामकाज करावे, अशा सूचना केल्याने महाशिवरात्रीच्या सार्वजनिक सुट्टीदिवशीही कामकाज सुरु होते. त्यामुळे दररोजच्या प्रमाणे जिल्हा परिषद गजबजली होती.
मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे विविध योजना, विकास कामांसाठी शासनाकडून अनुदान, निधी प्राप्त होत असतो. हे अनुदान बीडीएस प्रणालीद्वारे तात्काळ कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक असते. दरम्यान, सध्या जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागाकडील पदभरती प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत जोरदारपणे कामे सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.
येत्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील विविध योजना, विकास कामांसाठीचा निधी वापर होणे आवश्यक आहे. दरम्यान, शुक्रवारी महाशिवरात्री तर शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने तीन दिवस कार्यालये बंद राहणार असल्याचे पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी शुक्रवार, शनिवारी व रविवारीही जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व कार्यालये नियमितपणे सुरु ठेवण्याच्या सूचना केल्या. या दिवशी कोणताही कर्मचारी अनुपस्थित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना कार्यालय प्रमुखांना केल्या आहेत.
अधिकारी, कर्मचारी कामात कार्यमग्न...
जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, पंचायत, लेखा व वित्त विभाग, लघुपाटंबधारे, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, बांधकाम, कृषी- पशूसंवर्धन आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी महाशिवरात्रीदिवशी कार्यमग्न असल्याचे पहावयास मिळाले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.