एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी
By हरी मोकाशे | Published: September 1, 2022 11:52 AM2022-09-01T11:52:02+5:302022-09-01T11:52:42+5:30
राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे.
लातूर : शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम गुरुवारपासून सुरु करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विभागीय कृषी सहसंचालक दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री विविध गावांत शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. तिथेच मुक्काम करुन गुरुवारी सकाळीही ग्राम संजीवनी समितीच्या बैठका घेत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या हे समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रशासनातील सर्व अधिकारी, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहेत.
या उपक्रमाअंतर्गत बुधवारी रात्री विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर हे लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने हे उदगीर तालुक्यातील तादलापूर येथे, आत्माचे प्रकल्प संचालक आर.एस. पाटील हे निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे मुक्कामी राहिले होते. तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकारीही निवडलेल्या गावांत मुक्कामी होते. रात्री शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
लक्ष्मण रेषेच्या पुढे जाऊन काम केले पाहिजे...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी तादलापूर येथे बुधवारी रात्री ११ वा. पर्यंत शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सरपंच अंबिका अविनाश पाटील, उपसरपंच पंडित दवर्षे, कृषी सहाय्यक वाघमारे, पोखराचे कर्मचारी राठोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी गावसाने यांनी कृषीच्या प्रत्येक योजनांची माहिती देऊन आढावा घेतला. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर गावसाने यांनी शेतकरी शिवशंकर पाटील यांच्या घरी मुक्काम केला. गुरुवारी सकाळी ग्रामसंजीवनी समितीची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.