जिरेनियम लागवडीतून तेलनिर्मिती; शेतकरी झाला लखपती !
By संदीप शिंदे | Published: May 23, 2023 08:47 PM2023-05-23T20:47:02+5:302023-05-23T20:50:01+5:30
होसूर येथील दत्तात्रय बगदरे यांचा पाच एकरावर प्रयोग
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील होसूर येथील शेतकरी दत्तात्रय बगदरे यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावर जिरेनियमची लागवड केली आहे. त्यातील एक एकरमधील पिकातून तेलनिर्मिती करीत त्यांनी चार महिन्यांत सव्वा लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
होसूर येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय माधवराव बगदुरे यांनी पारंपरिक पीक पध्दतीला फाटा देत आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुुरू केला. त्यातूनच त्यांनी कोरपड, आवळा, हळद व अद्रक, चंदनशेती अशी पिके घेतली. शिवाय फुलकोबी व मिरची यांसारखी भाजीपाल्याचीही पिके घेतली. त्यातून भरघोस उत्पन्न घेतले. सध्या ११ एकर क्षेत्रावर चंदन आहे. सोबतच पाच एकर क्षेत्रावर त्यांनी जिरेनियमसारखे नवीन पीक घेतले आहे.
या पिकाची जानेवारी महिन्यात लागवड केली असून, याची कापणी सुरू आहे. सव्वा एकर क्षेत्रावरील जिरेनियम पिकावर प्रक्रिया करून ११ किलो तेलाचे उत्पादन मिळाले आहे. एक किलो तेलाचा दर १० हजार रुपये आहे. दर तीन महिन्यांनी पिकाची कापणी करता येते. वर्षातून चार वेळेस कापणी केली जाते. जिरेनियमची एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षापर्यंत हे पीक कापणी करता येते, असेही बगदरे यांनी सांगितले.
मल्चिंग पेपरद्वारे तणाचा बंदोबस्त...
जिरेनियमच्या शेतामध्ये तणाचा बंदाेबस्त करण्यासाठी बगदरे यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला. प्रारंभी पाच एकर जिरेनियम लागवडपैकी १ एकर १० गुंठे क्षेत्रातील कापणी करून प्रक्रिया केली. यात ११ किलो तेल काढले. या तेलाची मुंबई येथे विक्री केली असता त्याला १० हजार रुपयांचा दर आहे. वर्षभरात तीन वेळा कटिंग करून तेल काढले जाते. वर्षभराचे एकरी उत्पन्न सव्वा तीन लाखांपर्यंत असून, खर्च वजा जाता दीड ते दोन लाख रुपये उरतात. - दत्तात्रय बगदुरे, शेतकरी