निलंग्यात वीज पडून एक ठार, औरादमध्ये महामार्गाचे पाणी दुकानात
By आशपाक पठाण | Published: September 8, 2022 09:06 PM2022-09-08T21:06:54+5:302022-09-08T21:07:07+5:30
गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
निलंगा/ औराद शहाजानी (जि. लातूर) : तालुक्यातील दापका लांबोटा शिवारात गुरूवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वीज पडून बाबुराव खंडू सुरवसे (५०) यांचा त्यांच्या शेतात मृत्यू झाला. तर दगडवाडी येथील विनायक रामा भोसले यांची एक म्हैस, आनंदवाडी- शिवणी (को.) येथील शेतकरी बालाजी शिंदे यांची एक म्हैस वीज पडून दगावली आहे. दरम्यान, निलंगा व परिसरात गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. रात्री ९ वाजेपर्यंत अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दीड ते दोन तास ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पाण्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील एका हॉटेलच्या बाजूस असलेल्या दुकानांत पाणी शिरले होते. तसेच दुकानासमोर लावलेली वाहने पाण्यात बुडाली होती. दापकावेस येथील बहुतांश घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. शहरातील रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असल्याने पेट्रोल पंप, दवाखान्यांतही पाणी शिरले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. मात्र कुठे किती नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळाली नसल्याचे नायब तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी सांगितले.
औरादमध्ये दुकानांमध्ये शिरले पाणी...
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी भागात सायंकाळी ६ ते ८ दरम्यान जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे महामार्गाचे पाणी दोन्ही बाजूला असलेल्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरले. अनेकांच्या दुकानात ८ ते १० फुट पाणी आहे. यात व्यापार्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दुकानातील पाणी काढण्यासाठी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अनेकांची धडपड सुरू होती. परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी, ग्रामीण भागाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. सायंकाळी ६ वाजेपासून वीजपुरवठाही बंद झाला आहे.रात्री ९ वाजेपर्यंतही वीज गुल होती.