कार पळविणाऱ्या टोळीतील एकास कारसह पुण्यातून उचलले 

By राजकुमार जोंधळे | Published: October 16, 2023 06:55 PM2023-10-16T18:55:49+5:302023-10-16T18:56:32+5:30

लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

One of the car hijacking gang was picked up from Pune along with the car | कार पळविणाऱ्या टोळीतील एकास कारसह पुण्यातून उचलले 

कार पळविणाऱ्या टोळीतील एकास कारसह पुण्यातून उचलले 

लातूर : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कार पळविणाऱ्या टोळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून कारसह सोमवारी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, लतुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून फियाट कंपनीची कार मध्यरात्री चोरट्याने लातूर- बार्शी जाणारे रोडवरून चोरून नेल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली होती. याबाबत गुन्हा करण्यात आला होता. हा  गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. खबऱ्याकडून पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार लातूर- बार्शी रोडवरुन चोरीला गेलेली कार पुणे येथील फुरसुंगी ते हडपसर रोडवर असून, एक व्यक्ती विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे.

या माहितीनंतर पोलिस पथक फुरसुंगी येथे तातडीने पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता गुन्ह्यात चोरीतील कार असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता, थोड्याच वेळात त्या कारमध्ये बसताना एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अरविंद बालाजी डावखरे (वय २१, रा. खुटवड चौक, फुरसुंगी ता. हवेली, जि. पुणे) असे असल्याचे सांगितले. ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री लातूर-बार्शी रोडवर पार्क केलेली कार चोरल्याचे कबूल केले. याप्रकरणात बालाजी डावखरे याला ताब्यात घेत कार जप्त केली.
 
ही करवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, अमलदार राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, मनोज खोसे, राम गवारे, शिंदे, चालक कुंभार, सायबर सेलचे पोलिस अमलदार गणेश साठे, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.

Web Title: One of the car hijacking gang was picked up from Pune along with the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.