हुल दिल्याने एक ट्रक रस्त्याच्या खाली उतरला, तर दूसरा ट्रक त्यावर धडकून उलटला
By संदीप शिंदे | Updated: September 6, 2024 18:21 IST2024-09-06T18:19:19+5:302024-09-06T18:21:28+5:30
बोरगाव काळे येथे दोन ट्रकचा अपघात झाल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प पडली होती

हुल दिल्याने एक ट्रक रस्त्याच्या खाली उतरला, तर दूसरा ट्रक त्यावर धडकून उलटला
बोरगाव काळे : मुंबईहून लातूरकडे औषधी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकचा बोरगाव काळे नजीकच्या पुलावर अपघात झाला. यात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले असून, जीवितहानी झालेली नाही. ट्रक रस्त्यावर आडवी झाल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांनी सांगितले, बोरगाव काळे येथील पुलावर एमएच २५ यु ७४३४ व एमएच ०४ सी २३३७ क्रमांकाच्या ट्रकचा अपघात झाला. दोन्ही ट्रक एकाच ठिकाणाहून लातूरकडे येत होत्या. समोरील ट्रकला एका वाहनाने हुल दिल्याने ट्रक रस्त्याच्या खाली उतरली. या ठिकाणी साईड पट्ट्या खचल्या असल्याने ट्रक रस्त्यावर आडवा झाला. त्याच्या मागोमाग चालणारा ट्रक पडलेल्या ट्रकला घासून सरळ रस्त्याच्या खाली गेला. मात्र जवळच पूल असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.