साडेतीन क्विंटल गांज्याच्या झाडासह एक जणाला अटक
By राजकुमार जोंधळे | Published: November 12, 2024 08:25 PM2024-11-12T20:25:59+5:302024-11-12T20:26:37+5:30
५४ लाखांचा मुद्देमाल जप्त : लातूर पाेलिसांची कारवाई...
राजकुमार जाेंधळे / लातूर : जिल्ह्यातील वाला (ता. रेणापूर) शिवारात एका शेतात ५३ लाख ८० हजार ६५० रुपयांचा लागवड केलेल्याा ३ क्विंटल ५८ किलाे गांजासह एकाला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी केली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार रेणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाला गावाच्या शिवारात एका शेतकऱ्याने शेतात गांजाच्या झांडाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याने दिली. या माहितीची खातरजमा करुन अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक सागर खर्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने वाला शिवारात प्रेमदास पांडुरंग पवार याच्या शेतात अचानकपणे छापा मारला. शेतातून ५३ लाख ८० हजार ६५० रुपयांचा लागवड केलेला गांजा जप्त केला. शेतमालक प्रेमदास पांडुरंग पवार (वय ४८, रा. फरदपूरतांडा, ता. रेणापूर) यास अटक करण्यात आली आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तपास रेणापूर ठाण्याचे सपोनि. नंदलाल चौधरी, अमलदार अभिजीत थोरात हे करीत आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, सुधीर कोळसुरे, नाना भोंग, मोहन सुरवसे, संजय कांबळे, युवराज गिरी, सचिन धारेकर, सिद्धेश्वर जाधव, नितीन कठारे, मनोज खोसे, जमीर शेख, राहुल कांबळे, चालक मुंढे, पाटील, सुहास जाधव यांच्या पथकाने केली.