एकच नारा, कंत्राटींना कायम करा; एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचा लातूरमध्ये मोर्चा
By हरी मोकाशे | Published: November 6, 2023 06:09 PM2023-11-06T18:09:19+5:302023-11-06T18:10:16+5:30
आंदोलनात नऊ आरोग्य संघटनांचा सहभाग...
लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी शहरातील टाऊन हॉल येथून जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढण्यात आला. एकच नारा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, अशा जोरदार घोषणा देत लक्ष वेधून घेण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी, एएनएम, समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या सर्वांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी पाच दिवसांपासून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या सुरू केला आहे. दरम्यान, शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी एनएचएमअंतर्गतचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील टाऊन हॉल येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हाभरातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा परिषदेत पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले.
आंदोलनात नऊ आरोग्य संघटनांचा सहभाग...
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना, आर.बी.एस.के. कॉन्ट्रॅच्युअल मेडिकल ऑफिसर युनियन, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघ, आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटना, कंत्राटी औषध निर्माता कृती समिती, महाराष्ट्र राज्य अस्थायी कुष्ठरोग तंत्रज्ञ असोसिएशन, कास्ट्राइब असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम कर्मचारी कल्याण संघटना सहभागी आहेत.