लातूर जिल्ह्यात ई-केवायसीसाठी दीड हजार शेतकरी सापडेनात; अग्रीमचे एक कोटी पडून

By हरी मोकाशे | Published: July 5, 2024 07:26 PM2024-07-05T19:26:40+5:302024-07-05T19:27:32+5:30

सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सव्वातीन लाख खातेदार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे.

One thousand farmers of Latur district cannot be found; 1 crore advance pending | लातूर जिल्ह्यात ई-केवायसीसाठी दीड हजार शेतकरी सापडेनात; अग्रीमचे एक कोटी पडून

लातूर जिल्ह्यात ई-केवायसीसाठी दीड हजार शेतकरी सापडेनात; अग्रीमचे एक कोटी पडून

लातूर : गतवर्षीच्या खरिपात पावसाने २१ पेक्षा अधिक दिवसांचा ताण दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे ३ लाख २५ हजार ७८६ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीमवर बोळवण करण्यात आली; मात्र त्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे ई- केवायसी न झाल्याने जवळपास एक कोटी बँकेत पडून आहेत. केवायसीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न सुरू आहे; परंतु सहा महिन्यांपासून हे शेतकरी सापडत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

गतवर्षीच्या खरिपात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होता. दरम्यान, पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील साठही महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीस दिले; परंतु पीक विमा कंपनीने केवळ ३२ मंडळांतील ३ लाख २५ हजार ७८६ शेतकऱ्यांना २२६ कोटी ४१ लाख ३२ हजार ३५ रुपये उपलब्ध करून दिले.

औसा तालुक्यास सर्वाधिक लाभ...
तालुका - लाभधारक खातेदार

अहमदपूर - ३७१५
औसा - ७९२६०
चाकूर - ५६०९८
देवणी - ७२७
जळकोट - १९६१५
लातूर - ७३६१३
निलंगा - ६०२८६
रेणापूर - १०८५६
शिरुर अनं. - १०१४३
उदगीर - ११४७३
एकूण - ३२५७८६

ई- केवायसीसाठी कृषीचा पाठपुरावा...
हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सव्वातीन लाख खातेदार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या लाभासाठी शेतकऱ्याचे बँक खात्याशी ई- केवायसी असणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे ई- केवायसी नाही. त्यामुळे सहा महिन्यांपासून पीक विम्याची रक्कम पडून आहे. ई- केवायसी पूर्ण करावी, म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

नुकसान हजारांत, भरपाई शेकड्यात...
जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ७८६ खातेदारांना २५ टक्के अग्रीम उपलब्ध झाला असला तरी त्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांना एक हजारपेक्षा कमी भरपाई मिळाली आहे. त्यामुळे नांगरणी, बी- बियाणे, खते, कीटकनाशक फवारणीसाठीचा खर्च आणि अग्रीमच्या रकमेचा ताळेबंद केल्यास नुकसान हजारांमध्ये आणि भरपाई शेकड्यात अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

कृषी कर्मचाऱ्यांना सातत्याने सूचना...
गतवर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीमची रक्कम बहुतांश खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे; मात्र दीड हजार खातेदारांनी ई- केवायसी केली नाही. ती पूर्ण करावी म्हणून सातत्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात येत आहेत. त्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.
- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Web Title: One thousand farmers of Latur district cannot be found; 1 crore advance pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.