तीन दुचाकींसह एकाला पाेलिस पथकाने उचलले, लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Published: December 1, 2023 08:04 PM2023-12-01T20:04:34+5:302023-12-01T20:04:48+5:30
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दुचाकीसह इतर गुन्ह्यांतील आराेपींच्या अटकेबाबत आदेश दिले हाेते.
लातूर : चाेरीतील तीन दुचाकींसह एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी उचलले असून, चाैकशीत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या तीन दुचाकी लातुरातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून टाेळीने पळविले हाेते. याबाबत त्या-त्या पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दुचाकीसह इतर गुन्ह्यांतील आराेपींच्या अटकेबाबत आदेश दिले हाेते. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात घडलेल्या गुन्हांची माहिती संकलित करण्यात आली. या गुन्ह्यांच्या तपासाबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. स्थागुशाच्या पथकाने दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार हा बाभळगाव नाका, रिंग रोड परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली.
बाभळगाव नाका परिसरातून अटक...
पाेलिस पथकाने बाभळगाव नाका परिसरात रस्त्यावर दुचाकीसह थांबलेल्या एका विश्वासात घेत अधिक विचारपूस केली असता त्याने अमजद उर्फ इस्माईल गफूर पटेल (वय २९, रा. रावणगाव ता. उदगीर जि. लातूर ह.मु. वैशाली नगर, बाभळगाव, लातूर) असे सांगितले. ताब्यातील दुचाकीबाबत चाैकशी केली असता, ती काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरल्याचे सांगितले. शिवाय, लातुरात विविध ठिकाणाहून आणखी काही दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे पाेलिस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.