२ ते ६ रुपये किलोचा भाव...कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर लॉकडाऊन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:03 PM2020-05-11T16:03:25+5:302020-05-11T16:11:11+5:30
लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे.
- आशपाक पठाण
लातूर : लॉकडाऊनमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, देशातील विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फरफट होत आहे. हैदराबाद, सोलापूर, लासलगाव आदी भागांत जाणारा कांदा लातूरच्या बाजारात येत आहे. त्यामुळे महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.
लातूरचा आडत बाजार रोखीच्या व्यवहारात प्रसिद्ध असला तरी बाजार समितीअंतर्गत असलेल्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये मात्र स्थानिक शेतकऱ्यांव्यतिरिक्त बाहेरून येणारी फारशी आवक नव्हती. येथील बाजारात ५०० ते ६०० क्विंटलच्या वर कांद्याची आवक कधीही पोहोचलेली नव्हती. लॉकडाऊनमुळे मात्र भाजीपाला बाजारात कांद्याची आवक दुप्पट नव्हे तर तिप्पट झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच दीड हजार क्विंटलनहून अधिक आवक झाल्याची नोंद झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक सुरू झाल्याने जागा पुरत नव्हती. परिणामी, फिजीकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून भाजीपाला बाजार रिंगरोड लगत असलेल्या पशुधनाच्या बाजारात सुरू करण्यात आल्याने महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आता बाहेरच्या शेतकऱ्यांची अधिक वर्दळ आहे.
हैदराबाद, सोलापूरकडे जाणारा कांदा लातूरला...
लातूर, उस्मानाबाद, बीड, नगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हैदराबाद, सोलापूर, लासलगाव येथील बाजारात कांदा विक्री करीत होते. लॉकडाऊनमुळे तेथील बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे बीड, केज, परळी, उस्मानाबाद, तुळजापूर आदी भागांतील शेतकरी लातूरच्या भाजीपाला बाजारात कांदा घेऊन येत आहेत. सोमवारी १ हजार ५५० क्विंटलची आवक असून, इथल्या बाजारातील उच्चांकी आवक आहे, असे महात्मा फुले भाजीपाला मार्केटचे प्रमुख वसंत पवार यांनी सांगितले.
२ ते ६ रुपये किलोचा भाव...
उन्हाळी हंगामात पाण्याचे प्रमाण कमी असते. उन्हाची तीव्रताही अधिक असल्याने मेहनत अधिक करावी लागते. यावर्षी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लॉकडाऊनमुळे जिथे अधिक भाव मिळतो, अशा बाजारपेठा बंद आहेत. शिवाय, आठवडी बाजारही बंद आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मिळेल तो दर पदरी पाडून घेत कांद्याची विक्री करीत आहेत. लातूरच्या बाजारात २ रुपयांपासून ६ रुपयापर्यंत प्रति किलो दर शेतकऱ्यांच्या पदरी पडला. त्यातही वाहनभाडे, काढणीचा खर्च, आडतीवरील खर्च असे एकूण गणित केल्यास पदरी निराशेशिवाय काहीच नाही, अशी भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे.