बळीराजाचा अडचणींचा फेरा सुटेना; बँकांकडून ४४ टक्केच पतपुरवठा!
By हरी मोकाशे | Published: June 29, 2024 08:56 PM2024-06-29T20:56:14+5:302024-06-29T20:57:26+5:30
खरीप हंगाम : सव्वालाख शेतकऱ्यांना १ हजार ७६ कोटी कर्ज वितरण
हरी मोकाशे, लातूर : गेल्या वर्षी साेयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने आणि बाजारपेठेत दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे खरीपासाठी कर्जाकडे लक्ष लागून आहे. परंतु, बँकांनी आखडता हात घेतल्याचे पहावयास मिळत आहे. आतापर्यंत केवळ ४४.८६ टक्के पतपुरवठा करण्यात आला आहे. परिणामी, बळीराजाचा आर्थिक अडचणीचा फेरा सुटत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून त्यावरच संपूर्ण वर्षभराची भिस्त असते. जिल्ह्यात सोयाबीनचे पीक हुकमी मानले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरा होतो. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा ओढा आणखीन वाढला. मात्र, त्यानंतर सतत दरात घसरण होत गेली. सध्या तर ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास दर आहे. परिणामी, उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरिपासाठी आर्थिक अडचण जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे.
सोयाबीनचे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्र...
जिल्ह्यात खरिपाचा ५ लाख ९७ हजार हेक्टरवर पेरा हाेईल, असा अंदाज होता. यंदा वेळेवर मृग बरसल्याने आतापर्यंत जवळपास ८३ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ७ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे.
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदत...
शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थचक्र खरिपावर अवलंबून असते. त्यामुळे खरीपात बी- बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी बळीराजास आर्थिक अडचण भासू नये म्हणून बँकांच्या वतीने पतपुरवठा करण्यात येतो. त्यातून शेतकऱ्यांची नड भागल्याने खासगी कर्जाची गरज भासत नाही. मात्र, आतापर्यंत ४४.८६ टक्के कर्ज वितरण झाले आहे.
सर्वाधिक कर्ज जिल्हा बँकेकडून...
बँक - कर्ज वितरण (टक्के)
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - ७६.२६
व्यापारी व इतर बँका - २३.६५
ग्रामीण बँक - ४७.१५
एकूण - ४४.८६
जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना कर्ज...
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २२ बँकांना २ हजार ३९९ कोटी ९९ लाखांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी जिल्हा बँकेेने ८४ हजार ५२१ शेतकऱ्यांना ६५० कोटी ७५ लाख ९१ हजार, ग्रामीण बँकेने १० हजार ९७२ शेतकऱ्यांना १२० कोटी ७० लाख तर राष्ट्रीयकृत व इतर बँकांनी २८ हजार १७ शेतकऱ्यांना ३०५ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार ५१० शेतकऱ्यांना १ हजार ७६ कोटी ६४ लाख ९१ हजारांचे कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
कर्ज वितरणाच्या सूचना...
शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविण्यासाठी जिल्हा बँकेने अधिक कर्ज वितरण केेले आहे. इतर बँकांनीही लवकर पतपुरवठा करावा म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक आठवड्यास शासन स्तरावरून आढावा घेण्यात येत आहे. - संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).