दुष्काळ निधीत ६ कोटींवर लातूर जिल्ह्याची बोळवण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 06:43 PM2019-02-07T18:43:30+5:302019-02-07T18:43:54+5:30
खरीप हंगामाध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली. रबीचा पेराही झाला नाही.
- हणमंत गायकवाड
लातूर : लातूर जिल्ह्याची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना १० पैकी केवळ एकाच तालुक्याला ६ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३ कोटी ३१ लाख रुपये पहिल्या हप्त्यात मिळणार आहेत. उर्वरित नऊ तालुके दुष्काळनिधीच्या प्रतीक्षेत आहेत . सद्य:स्थितीत ६ कोटींवरच बोळवण केल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे.
लातूर जिल्ह्यात ५३ महसूल मंडळे आहेत. या सर्वच महसूल मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप आणि रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. रबीचा पेरा तर १०० टक्केही होऊ शकला नाही. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील एकमेव शिरूर अनंतपाळ तालुक्याचा समावेश आहे. लातूर, निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, देवणी, जळकोट, रेणापूर, चाकूर या नऊ तालुक्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
पीकविमा व दुष्काळ जाहीर करावा म्हणून चाकूर तहसील कार्यालयात अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आ. विनायकराव पाटील यांनी उपोषण केले. जिल्हास्तरावरही पाठपुरावा केला; मात्र अद्याप काहीच उपाययोजना नाहीत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना केवळ कागदावरच दिसत आहेत. गायी-म्हशी विकत घेणे, शेळीपालन, कुक्कुट पालन, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, मिनी डाळ मिल, मिनी आॅईल मिल, पॅकिंग व ग्रेडिंग सेंटर, ट्रॅक्टर व औजारे, पॉवर टिलर या योजनेचाही लाभ दुष्काळी योजना म्हणून केला जात नसल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच...
खरीप हंगामाध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली. रबीचा पेराही झाला नाही. शासनाने सरसकट एकरी ५० हजार रुपये दुष्काळ भरपाई देणे गरजेचे असताना केवळ एका तालुक्यालाच निधी जाहीर केला आहे, ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची भावना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी व्यक्त केली.