अपहरण प्रकरणात रियांशच्या जबाबानंतरच लागणार आरोपींचा सुगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 03:02 PM2020-09-14T15:02:52+5:302020-09-14T15:04:54+5:30
सांगवी येथील घराच्या अंगणात खेळणाऱ्या रियांश नीळकंठ सावंत या पाच वर्षीय मुलाचे एका कारमधून अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती.
लातूर : रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपींचा सुगावा मुलगा आणि कुटुंबियांच्या जबाबानंतरच लागणार आहे. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे, तर लोखंडी सावरगाव येथील एका पेट्रोलपंपावर आरोपी कारमध्ये इंधन भरतानाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. गुन्ह्यातील वाहन जप्त करण्यात आलेल्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
सांगवी येथील घराच्या अंगणात खेळणाऱ्या रियांश नीळकंठ सावंत या पाच वर्षीय मुलाचे एका कारमधून अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. शनिवारी रात्री पोलीस पथकांचा ससेमिरा मागे लागल्याने आरोपींनी रियांशला चाटा गावानजीकच्या रस्त्यावर सोडून पोबारा केला होता. पोलिसांनी रियांशला ताब्यात घेतले. अखेर २४ तासांनंतर रियांशची सुटका झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. शनिवारी रात्री उशिरा रियांशला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
दुसऱ्या दिवशीही आरोपी मोकाटच
एकूण बारा पोलीस पथके आरोपींच्या मागावर होते. अखेर २४ तासांनंतर रियांश चाटा गावात सापडला. मात्र, दुसऱ्या दिवशीही आरोपी मोकाटच होते. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव म्हणाले, आरोपींचा शोध पथके घेत आहेत, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील. रियांशचा जबाब यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अपहरणाच्या काही तासांनंतर स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस पथकांनी रस्त्यालगत हॉटेल, धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. अखेर लोखंडी सावरगाव (जि. बीड) येथील पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. इंधन भरतानाचे फुटेज, रियांशचा जबाब आणि कारमुळे आरोपीपर्यंत पोहोचता येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.