सरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 04:51 PM2018-11-18T16:51:37+5:302018-11-18T16:52:16+5:30

राष्ट्रीय युवा योजना व विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातुरातील ग्रोल्डक्रेस्ट हाय विद्यालयाच्या प्रांगणात १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे उद्घाटन सुब्बाराव यांच्या हस्ते झाले.

only Talks of Integration by the Government: S. N. Subbarao | सरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव

सरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव

Next

लातूर : पंतप्रधान आपल्या भाषणातून देशाच्या अखंडतेविषयी सातत्याने बोलतात़ मात्र, उक्तीप्रमाणे कृती कोठेही दिसत नाही. याच सरकारमधील महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्र्यांना तर एकात्मता वाढीस लावणाऱ्या कार्यक्रमांसाठी वेळही नाही, अशी खंत व्यक्त करताना आता एकात्मता, देशाची अखंडता ही आपल्या सर्वांची जबाबदारी समजून देशातील प्रत्येक नागरिकाने पुढे यायला हवे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी नेते तथा राष्ट्रीय युवा योजनेचे संचालक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांनी रविवारी लातुरात व्यक्त केले.


राष्ट्रीय युवा योजना व विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातुरातील ग्रोल्डक्रेस्ट हाय विद्यालयाच्या प्रांगणात १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे उद्घाटन सुब्बाराव यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. सुब्बाराव म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेच्या केवळ गप्पा मारुन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. भाषेच्या अस्मितेवरुन अनेक देशांचे तुकडे पडले आहेत. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, रशिया, आफ्रिकेचेही भाषा, धर्माच्या मुद्यावरुन तुकडे पडले आहेत. आपल्या देशात अनेक भाषा, जाती-धर्म अस्तित्वात असूनही आपण एकसंघ आहोत, हे जगासाठी आदर्श आहे. १९६२ साली आपल्या देशाच्या संरक्षणाचा खर्च ३०० कोटी होता. आजघडीला तो १ लाख ९८ हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित असल्या तरी अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी आता इथल्या प्रत्येक नागरिकाला घ्यावीच लागणार आहे. केवळ बंदुकीच्या जोरावर देशाची अखंडता टिकणार नाही. त्यासाठी सर्वांनी एक होणे गरजेचे आहे. जात-धर्म-भाषेवरुन भांडणे होणार नाहीत, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपण सर्वजण ‘भारत की संतान’ आहोत, ही भावना रुजविणे गरजेचे आहे. यासाठीच बालमनात हे संस्कार रुजवून शांततेचा, एकतेचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील बालमने इथे एकवटल्याचे डॉ. सुब्बाराव म्हणाले.


जग जितके छोटे होत चालले आहे, तितकेच आता आपली हृदये माणसाला विशाल करावी लागणार आहेत. आचार्य विनोबांनी हे तेव्हाच जाणले होते. म्हणूनच त्यांनी ‘जय जगत्’चा नारा दिला. हा नारा, बापू अन् आचार्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी या देशातील प्रत्येक नागरिकाने उचलावी, असे आवाहनही डॉ. सुब्बाराव यांनी केले.


भारतच नव्हे तर भारमातेचीही वाटणी
देशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी जे काम सरकारने करायला हवे, ते काम राष्ट्रीय युवा योजनेच्या माध्यमातून डॉ़सुब्बाराव करीत आहेत़ जात-धर्मावरुन भारताची वाटणी करण्याचे काम हे सरकार करीत आले आहे़ आता तर भारतमातेचीही वाटणी सरकारकडून केली जात असल्याचे मत माजी राज्यमंत्री आ़ अमित देशमुख यांनी व्यक्त केले़
 

Web Title: only Talks of Integration by the Government: S. N. Subbarao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.