ऑपरेशन मुस्कान! बेपत्ता मुलींचा शाेध घेण्यात लातूर पाेलिस पथकाला यश
By राजकुमार जोंधळे | Published: November 8, 2023 11:26 PM2023-11-08T23:26:12+5:302023-11-08T23:28:38+5:30
चार वर्षांनंतर हैदराबादमधून घेतले ताब्यात
लातूर : गत चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलींचा शाेध घेण्यात लातूर पाेलिसांना यश आले आहे. यासाठी पाेलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान- १२’ ही माेहीम राबविली.
सन २०१९ मध्ये शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित पोलिस ठाण्याचे पाेलिस पथक या मुलींचा शाेध घेत हाेते. मात्र, मुलींचा शाेध लागत नव्हता. त्याचबराेबरच विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, मुंबई यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या शाेधाबाबत आणि बेपत्ता झालेल्या महिलांच्या शोधाबाबत स्पष्ट निर्देश देत ‘ऑपरेशन मुस्कान १२’ ही शोधमोहीम १ ते ३० नाेव्हेंबर या काळात प्रभावीपणे राबविण्याच्या सर्व पोलिस विभागांना सूचना केल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले, आतापर्यंत आढळून न आलेल्या मुलामुलींचा आढावा घेत त्यांचा शोध घेण्यासाठी आदेश दिले.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात २०१९ पासून तपासावर असलेल्या गुन्ह्यातील पीडित मुलीचा पथकामार्फत ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत विविध जिल्ह्यांत शोध घेतला. सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीवरून हैदराबाद येथे शोध घेण्यात आला. हैदराबाद येथे ती मुलगी आढळून आली. त्याच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तीला पाेलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन मुस्कान- १२’अंतर्गत पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दरोडे, पोलिस अंमलदार शिंदे, टिपराळे, लोखंडे आणि सायबर सेलच्या पथकाने केली.