मतमोजणी केंद्रावरील गर्दीत साधली संधी; माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह दोघांचे पाकिट मारले
By संदीप शिंदे | Published: May 2, 2023 04:25 PM2023-05-02T16:25:57+5:302023-05-02T16:26:08+5:30
तिघांचे पाकिट मारत चोरट्याने साधली संधी; नागरिकांनी पाठलाग करुन चोरट्यास पकडले
औराद शहाजानी (जि.लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी मतदान आणि लागलीच मतमोजणी झाली. मात्र, यावेळी केंद्राबाहेर थांबलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह आजी-माजी संचालकांचे पॉकिट चोरट्यांनी लंपास केले. ही बाब लक्षात येताच आरडाओरड झाल्याने नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यास पकडण्यात यश आले आहे.
औराद शहाजानी बाजार समितीची निवडणूक रविवारी पार पडली. यानंतर सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील केंद्रावर मतमोजणी झाली. यावेळी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व सर्वच पक्षांची कार्यकर्ते, नेत्यांची उपस्थिती होती. गर्दी असल्याने हीच संधी साधत चोरट्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, बाजार समितीचे माजी संचालक सुभाष डावरगावे, व एका विद्यमान संचालकाचे गेटमधून आत जाताना पाकिट मारले. आपले पाकिट खिशात नसल्याचे डावरगावे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे रवी कोंडीबा दोनगहू (वय ३८ रा. राजुनगर, लातूर) यास पाठलाग करुन पकडले. चोरट्याने २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. प्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.