ओबीसी आरक्षणात इतर जातींच्या समावेशाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 06:36 PM2020-10-05T18:36:03+5:302020-10-05T18:36:29+5:30
ओबीसी आरक्षणामध्ये इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
निलंगा : ओबीसी आरक्षणामध्ये इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
विविध जाती- जमातीतील नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलनाला सुरुवात केली़. धरणे आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले़. भारतीय राज्यघटनेनुसार ओबीसींना दिलेले आरक्षण कायम अबाधित ठेवावे़. यात दुसऱ्या जाती समुहाचा समावेश करू नये़ यासोबतच उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी़, ओबीसींचा अनुशेष भरून काढावा़ ओबीसी आर्थिक विकास महामंडळास १५०० कोटींचा निधी देण्यात यावा़, राज्यातील महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळांना शासनाने भरीव निधी द्यावा़ एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या थकित शिष्यवृत्ती त्वरित द्यावी आणि पूर्ववत शिष्यवृत्ती सुरु करावी़ एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेत पदोन्नती द्यावी़, राज्यातील विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत आर्थिक मदत देण्यात यावी़, नॉन क्रिमिलेयरची मर्यादा २० लाखापर्यंत करण्यात यावी़, ओबीसीची जातीनिहाय गणना करावी़, महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नोकर भरतीमधील ओबीसीचा आरक्षणाचा कोटा पूर्णत: भरावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या़
आंदोलनाप्रसंगी मसनजोगी, पोतराज यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपली पारंपरिक कला सादर करुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.