घरणीचे पाणी चाकूरला देण्यास विरोध; १५ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By हणमंत गायकवाड | Published: March 12, 2024 05:45 PM2024-03-12T17:45:17+5:302024-03-12T17:46:47+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांना घेतले ताब्यात
लातूर: महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत चाकूर नगरपंचायतीला घरणी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. ही योजना मंजूर न करता तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी नळेगावसह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांनी आंदोलन सुरू केले असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
घरणी प्रकल्पावर नळेगाव, देवंग्रा, सुगाव, शिवपूर, शिरुर अनंतपाळ, हिप्पळगाव, उजेड, लिंबाळवाडी यासह चाळीसगाव अवलंबून आहेत. पुन्हा चाकूरला या प्रकल्पावरून पाणी दिल्यास प्रस्तुत गावांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नळेगाव येथील नागरिकांनी चाकूरला पाणी देण्यास विरोध केला आहे. सोमवारी नळेगाव बंद करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. जिल्हा विकास सनियंत्रण व दक्षता समितीचे सदस्य अनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात उमाकांत सावंत, शिवाजी बरचे, दयानंद मानखडे, राजेंद्र शेलार, घरनेश्वर मलशेट्टी, ईश्वर पांढरे, राजेंद्र सावंत, व्यंकट माचवे, सुभाष तेलंगे, भुजंग अर्जुने, दत्तात्रय नरवडे, बाळासाहेब बरचे, सुनील भोसले, नवनाथ वानखडे यांचा समावेश होता. त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.