आपले गुरुजी अभियानास विरोध; काळ्या फिती लावून शिक्षकांकडून निषेध
By संदीप शिंदे | Published: September 5, 2022 12:23 PM2022-09-05T12:23:50+5:302022-09-05T12:24:13+5:30
आपले गुरुजी या उपक्रमांतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याच्या सूचना आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे
लातूर : शाळेतील वर्गामध्ये आपले गुरुजी या उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो लावण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या उपक्रमाला विरोध तसेच आ. प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल घेतलेल्या भूमिकेला विरोध दर्शविण्यासाठी शिक्षक काँग्रेसने सोमवारी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त इतर कामेही सोपविण्यात आली आहेत. त्यातच आता आपले गुरुजी या उपक्रमांतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याच्या सूचना आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी असून, आ. प्रशांत बंब हे शिक्षकांविषयी विविध वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे शिक्षक बांधवांमध्ये नाराजीचा सूर असून, निषेध नोंदविण्यासाठी काळ्या फिती लावून काम करीत असल्याचे शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील नवीन चांडेश्वर, हरंगुल, लाभोटा, बोरी, सळगरा, वासनगाव, खोपगाव, कव्हा, लोदगा, चिंचोलीराव वाडी, गंगापूर आदी शाळांमध्ये काळ्या फिती लावून अध्यापनाचे काम शिक्षकांनी केले. यामध्ये प्रकाश जाधव, दत्तात्रय चिवडे, शंकर कदम, प्रताप सोमवंशी, सुरेश सुडे, बालाजी सर्जे, अमोल राठोडे, विकास माने, राजकुमार सोमवंशी, मंदाकिनी भालके, माधुरी वलसे, मीना क्षीरसागर, छाया पुरी, वर्षा शिंदे, रेश्मा गायकवाड आदींसह विविध जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी सहभाग नोंदविला.