१६ हजारपैकी ३ हजार शेतकऱ्यांनी केली हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:36+5:302021-05-19T04:19:36+5:30
लातूर : यंदाच्या खरीप हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याबराेबरच दरही आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने, शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीस अधिक ...
लातूर : यंदाच्या खरीप हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याबराेबरच दरही आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने, शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीस अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या १६ हजार १२३ पैकी केवळ ३ हजार २१ शेतकऱ्यांनी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री केली आहे. दरम्यान, आता बाजारपेठेतील दरात घसरण होत आहे.
गेल्या पावसाळ्यात अधिक पाऊस पडल्याने जलसाठे तुडुंब भरले होते. त्याचा लाभ खरीप हंगामासाठी झाला. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाचा यंदा ज्यादा पेरा झाला होता. त्याचबरोबर पिकांना पुरेसे पाणी मिळाल्याने उत्पादनही चांगले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी केल्यानंतर विक्री करण्यास सुरुवात केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवातीपासून हरभऱ्याला चांगला दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकही लाभ मिळाला.
केंद्र शासनाने हरभऱ्यास ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल अशी आधारभूत किंमत जाहीर केली होती. जिल्ह्यातील १६ हजार १२३ शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार नाफेडच्यावतीने शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून २४ फेब्रुवारीपासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, बाजार समित्यांत हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवित बाजार समितीत हरभऱ्याची विक्री केली. त्यामुळे जिल्ह्यातील १६ आधारभूत खरेदी केंद्रांवर आतापर्यंत केवळ ३ हजार २१ शेतकऱ्यांचा ४६ हजार ६५० क्विंटल हरभरा खरेदी केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून बाजार समितीतील हरभऱ्याच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी हरभऱ्याला ४ हजार ९०० ते ४ हजार ६६० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. त्यामुळे हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना किमान ५०० रुपयांपेक्षा अधिक फटका प्रति क्विंटलमागे बसत असल्याचे दिसून येत आहे.
४६ हजार क्विंटल हरभरा खरेदी...
यंदाच्या खरीप हंगामात हमीभाव खरेदी केंद्रांवर ३ हजार २१ शेतकऱ्यांचा ४६ हजार ६५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यापोटी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर २४ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. खुल्या बाजारपेठेत अधिक दर राहिल्यामुळे यंदा कमी प्रमाणात हरभऱ्याची खरेदी झाली आहे, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी सांगितले.
विक्रीसाठी २४ मेपर्यंत मुदत...
ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रावरून हरभरा विक्रीसाठी एमएमएस पाठविण्यात आले आहेत. सध्या बाजारपेठेत दर घसरल्याने शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर आपला हरभरा विक्री करावा. त्यासाठी २४ मेपर्यंत मुदत आहे. या मुदतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सुमठाणे यांनी केले आहे.