उदगीरातील ११२ गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:09+5:302021-04-23T04:21:09+5:30
उदगीर : उदगीर शहरासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे तालुक्यातील १२० पैकी ११२ गावांत पॉझिटिव्ह ...
उदगीर : उदगीर शहरासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे तालुक्यातील १२० पैकी ११२ गावांत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण ६ हजार ६०५ बाधितांची नोंद झाली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे काही नागरिकांनी दुर्लक्ष केल्यामुळे संसर्ग वाढला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून कोविड चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. तसेच लसीकरणाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
‘ब्रेक द चेन’अंतर्गत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सुरुवातीस दंडात्मक मोहीम हाती घेण्यात आली. परंतु, काहीजण फिरत असल्याचे आढळून आल्याने पुन्हा अशा बेफिकीर व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात येत आहे. तसेच आशा स्वयंसेविका बाधितांच्या हायरिस्कमधील व्यक्तींची माहिती घेऊन कोविड चाचणी केली जात आहे. नागरिकांनी मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्स राखावा, शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले आहे.
निडेबन, मादलापूरमध्ये अधिक रुग्ण...
तालुक्यात ११२ गावांत कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. तालुक्यातील निडेबन, मादलापूर, मलकापूर, हंडरगुळी व नळगीर येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तेथील संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती, सर्वेक्षण, घरावर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पोस्टर्स लावणे, कोविड चाचणी करण्यात येत आहे.
- डॉ. प्रशांत कापसे, तालुका आरोग्य अधिकारी.
३५० खाटांचे काम सुरू...
उदगीरातील कोरोनाची स्थिती पाहून पशुवैद्यकीय महाविद्यालयात १२० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. अन्य काही ठिकाणी कोविड रुग्णांना सेवा दिली जात आहे. तसेच ३५० खाटा उपलब्ध करण्याचे काम सध्या सुरू आहे.
- प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय अधिकारी.
चौकट...
एकूण बाधित : ६६०५
उपचारानंतर बरे : ४६३०
ॲक्टिव्ह रुग्ण : १८५१
मृत : १२४
होम आयसोलेशन : १३३८
कोविड केअर सेंटर : ३३४