गव्हावर मर रोगाचा प्रार्दुभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:35 AM2020-12-16T04:35:05+5:302020-12-16T04:35:05+5:30
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ आणि परिसरात परतीच्या पावसामुळे विहीरी, बोअर आणि नदी - नाले तुडूंब भरल्याने पाणीपातळीत वाढ झाली ...
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ आणि परिसरात परतीच्या पावसामुळे विहीरी, बोअर आणि नदी - नाले तुडूंब भरल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. याच पाण्याच्या आधारे परिसरातील शेतकरी सिंचनद्वारे रबी पिकांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. वातावरणातील बदलामुळे शेतकर्यांना नैसर्गिक संकटाने चांगलेच घेरले आहे. खरिप हंगामात अतीवृष्टीने उडीद, मूग व सोयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्याला उपलब्ध पाण्यावर शेतकरी खरिप हंगामातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी रबी पिकासह भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. मात्र, गत आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे दिवसा कडक उन्ह, रात्री कडक थंडी तर पहाटे धुके पडत असल्याने याचा अनिष्ट परिणाम रबी पिकावर होत आहे. सुरुवातीला हरभरा पिकावर मुरकोज रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने हरभर हातचा गेला आहे. तर आता गहू पिकावर मर रोगाचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. परिणामी, हे पिक पिवळे पडून वाळत असल्याने शेकडो हेक्टरावरील पिकाचे नुकसान होत आहे.
रबीचा हंगामही आला धाेक्यात...
सध्याच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हरभरा, गहू व ज्वारीच्या पिकावर रोगाचे आक्रमण वाढले आहे. पूर्वी येरोळ येथे कायमस्वरूपी कृषीसहाय्यक होते. मात्र, येथे सध्याला प्रभारी कृषीसहाय्यक कार्यरत आहेत. त्यांना साकोळ आणि येरोळ या दोन गावांचा पदभार देण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकर्यांमध्ये जनजागृती आणि कृषी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
- शिवानंद भुसारे, शेतकरी येरोळ