लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?
By संदीप शिंदे | Published: April 3, 2023 05:10 PM2023-04-03T17:10:57+5:302023-04-03T17:11:18+5:30
२२ हजार ५६५ बाधित शेतकरी : १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लातूर : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबीतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून पुर्ण करण्यात आले असून, याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील २२ हजार ५६५ बाधित शेतकऱ्यांचे १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नजरा आता मदत केव्हा मिळणार याकडे लागले आहेत.
जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिकांसह द्राक्ष, टरबूज, खरबुज, पपई, आंबे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यातील २२ हजार ५६५ शेतकऱ्यांचे १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्रावरील ८ हजार ६८२ हेक्टर, बागायतीचे १ हजार ७८ हेक्टर तर फळपिकांचे ५९७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे आता नुकसानीची मदत केव्हा मिळते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या...
लातूर तालुक्यात १ हजार २७०, रेणापूर ५२७९, निलंगा ७६४७, शिरुर अनंताळ ५५२, देवणी ५५४६, उदगीर ३५५, जळकोट १८१९, अहमदपूर ३५ व चाकूर तालुक्यात ६२ असे एकूण २२ हजार ५६५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक शेतकरी संख्या निलंगा तालुक्यात आहे. जिल्ह्यातील केवळ औसा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेले नाही.
तालुकानिहाय पीक नुकसानीचे क्षेत्र...
जिल्ह्यात सर्वाधिक निलंगा तालुक्यात ४ हजार २३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर लातूर तालुक्यात ५५६ हेक्टर, रेणापूर २२११, शिरुर अनंताळ १४७, देवणी २ हजार ४६५, उदगीर १४१, जळकोट ७७३, अहमदपूर १७ व चाकूर तालुक्यात ३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकरी आणि बाधित क्षेत्राचे पंचनामे पुर्ण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
नुकसानीमध्ये जिरायत क्षेत्र सर्वाधिक...
अवकाळी पाऊस व गारपीटीने सर्वाधिक ८ हजार ६९२ हेक्टरवरील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर १ हजार ७८ हेक्टरवरील बागायती क्षेत्राला फटका बसला आहे. तसेच ५९७ हेक्टरवरील फळपिकांची नासाडी अवकाळी पाऊस व गारपीटीने केली आहे. नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाल्याने मदत केव्हा मिळणार याकडे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.