लातूरमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीचा विक्रम; ६० कोटी ४९ लाखांची वसुली
By हरी मोकाशे | Published: April 9, 2023 03:06 PM2023-04-09T15:06:55+5:302023-04-09T15:11:02+5:30
काय म्हणता, जिल्ह्यातील ३१ गावचे नागरिक करमुक्त!
हरी मोकाशे, लातूर : ग्रामीण भागातील पाणीपट्टी, घरपट्टी वसुली म्हणजे ग्रामपंचायतींपुढील कठीण अन् किचकट प्रश्न. मात्र, जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या विशेष कर वसुली दिनामुळे ही समस्या निकाली निघाली आहे. मार्चअखेरपर्यंत ६२ कोटी ५६ लाख २४ हजारांपैकी ६० कोटी ४९ लाख ८८ हजारांची कर वसुली झाली आहे. विशेष म्हणजे, ३१ ग्रामपंचायतींतील नागरिकांनी शंभर टक्के कर भरणा केल्याने ही गावे मालामाल झाली असून गावकरीही करमुक्त झाले आहेत.
कुठल्याही ग्रामपंचायतींची घरपट्टी, नळपट्टी नियमित वसूल होत नसल्याने त्याचा गावच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे मुलभूत सुविधाही पुरविणे ग्रामपंचायतीस कठीण होते. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आत्मनिर्भर व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी गेल्या वर्षीपासून दर महिन्यास विशेष कर वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
सुरुवातीस जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींतून अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न वाढविल्याशिवाय गावात नवीन उपक्रम राबविणे शक्य नाही. शिवाय, शासनाच्या निधीवर अवलंबून राहिल्यास गावचा विकासही साधता येणार नाही, हे या विशेष मोहिमेच्या माध्यमातून पटवून देण्यात आले.
इतिहासात पहिल्यांदाच ९७ टक्के वसुली...
सन २०२२-२३ या वर्षात पाणीपट्टी व घरपट्टीपोटी एकूण ६२ कोटी ५६ लाख २४ हजार रुपयांची वसुली अपेक्षित होती. मार्चअखेरपर्यंत एकूण ६० कोटी ४९ लाख ८८ हजार रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली आहे.
ग्रामपंचायत बरखास्तीची धास्ती...
७० टक्क्यांपेक्षा कमी कर वसुली झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त करण्यात येईल, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंचांचा ताण वाढला होता. या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वसुली केल्याने जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीची ७० टक्क्यांपेक्षा कमी वसूली झालेली नाही.
शंभर टक्के कर वसुलीची गावे...
लातूर : खाडगाव, सिकंदरपूर, वरवटी, बोरगाव. औसा : आपचुंदा, उटी बु., करजगाव, किल्लारी, खुंटेगाव, जवळगा पो., जायफळ, दावतपूर, फत्तेपूर, बेलकुंड, भादा, मंगरुळ, माळकोंडजी, लिंबाळा दा., वडजी, हिप्परगा क. अहमदपूर : केंद्रेवाडी, परचंडा, बोडका. रेणापूर : भंडारवाडी, खानापूर, नरवटवाडी, रामवाडी, तळणी. शिरुर अनंतपाळ : लक्कड जवळगा, तुरुकवाडी. देवणी : नागतीर्थवाडी.
लातूरचा राज्यभर लौकिक...
पहिल्यांदाच जवळपास ९८ टक्के कर वसुली झाली असून हा लातूर पॅटर्न राज्यभर होईल. कर वसुलीतून प्राधान्याने पथदिवे व पाणीपुरवठ्याचे वीजबिल भरणा करणे तसेच गावातील स्वच्छता आणि पाणीपुरवठाविषयक कामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.
गावकऱ्यांचे सहकार्य...
पायाभूत सुविधांसाठी कर भरणा आवश्यक असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनीही स्वत:हून कर भरणा केला. त्यामुळे शंभर टक्के वसुली. या पैश्यातून गावात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यास मदत हाेणार आहे. - राज गुणाले, सरपंच, नागतीर्थवाडी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"