लातूर शहरात पाणीपुरीवाल्याचा खून; दाेघांना पाेलिस काेठडी
By राजकुमार जोंधळे | Updated: March 16, 2025 19:05 IST2025-03-16T19:05:30+5:302025-03-16T19:05:49+5:30
न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

लातूर शहरात पाणीपुरीवाल्याचा खून; दाेघांना पाेलिस काेठडी
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरात पाणीपुरीचा व्यवसाय करण्यासाठी आलेल्या एका २० वर्षीय युवकाचा चाकूने भाेसकून खून करणाऱ्या दाेघांना रविवारी दुपारी लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, उत्तर प्रदेशातून लातूर येथे आलेल्या मनिष रूपसिंग पाल (वय २०, रा.घिलौर, ता.नंदीगाव, जि.जालाैन) हा युवक हरंगुळ (बु.) रेल्वे स्थानक परिसरात पाण्याच्या टाकीनजीक पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत हाेता. ताे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आपला ठेला घेऊन घराकडे निघाला हाेता. दरम्यान, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दत्ता संजय ढोरमारे (२०, रा.पटेलनगर, लातूर) आणि आयान अब्दुल शेख (२०, रा.कपिलनगर, लातूर) हे तेथे दाखल झाले. त्यांनी मनिष पाल याच्याकडे पैशाची मागणी केली.
त्यावेळी पैसे देण्यासाठी त्याने नकार दिला. यातूनच त्यांच्यामध्ये वादाला प्रारंभ झाला. यावेळी आराेपींनी मनिष याच्या पाेटात चाकू खुपसला आणि हातावरही सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेला मनिष रक्ताच्या थाराेळ्यात पडला. मारेकऱ्यांनी मनिषजवळील पैसे आणि माेबाइल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती त्याचा चुलत भाऊ याला मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत, मनिष पाल याला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले.
या प्रकरणी एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिसांनी दत्ता संजय ढोरमारे, आयान अब्दुल शेख याला शनिवारी दुपारीच अटक केली. त्यांना लातूर येथील न्यायालयात रविवारी दुपारी हजर करण्यात आले असता, न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. तपास पाेलिस निरीक्षक सुधाकर देडे हे करीत आहेत.