‘त्या’ शिक्षकांचे ३०% वेतन आई-वडिलांना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 06:39 PM2020-11-11T18:39:19+5:302020-11-11T18:41:24+5:30
काही शिक्षकांचे आई-वडील वृद्धाश्रमात असल्याचे चित्र
लातूर : जि.प. शाळांतील जे शिक्षक आई-वडिलांचा सांभाळ करीत नाहीत, त्यांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम वृद्ध माता-पित्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा ठराव जि.प.च्या सभेत मंगळवारी घेण्यात आला.
यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी जि.प. सदस्य मंचकराव पाटील यांनी ठराव मांडला. जि.प.चे जे शिक्षक आपल्या आई-वडिलांना सांभाळत नाहीत, त्यांची माहिती संकलित करून त्या शिक्षकांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम आई-वडिलांच्या खात्यावर जमा करावी. त्यासाठी सर्व्हे करावा, असे ठरावात म्हटले आहे. त्यास रामचंद्र तिरुके यांनी अनुमोदन दिले. जे सांभाळत नाहीत, अशांची चौकशी करावी, अशी मागणीही केली.
दरम्यान, उद्धव चेपट यांनी काही शिक्षकांचे आई-वडील वृद्धाश्रमात असल्याचे सांगितले. तेव्हा अध्यक्ष केंद्रे यांनी अशा शिक्षकांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग करण्याचा ठराव मंजूर केला.