संसद सुरक्षा प्रकरण : दिल्लीचे विशेष पोलिस पथक झरी गावात धडकले; आरोपीच्या कुटुंबीयांची केली चौकशी

By राजकुमार जोंधळे | Published: December 17, 2023 08:27 PM2023-12-17T20:27:02+5:302023-12-17T20:28:27+5:30

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली येथील विशेष पाेलिस पथक रविवारी झरी गावात दाखल झाले आहे.

Parliament Security Case Delhi Special Police Squad in Zari village; The family members of the accused were interrogated | संसद सुरक्षा प्रकरण : दिल्लीचे विशेष पोलिस पथक झरी गावात धडकले; आरोपीच्या कुटुंबीयांची केली चौकशी

प्रतिकात्मक फोटो

लातूर : संसदेची सुरक्षा भेदत परिसरात नळकांड्या फोडून धूर केल्याप्रकरणाच्या चाैकशीसाठी दिल्ली येथील विशेष पाेलिस पथक झरी (बु.) गावात रविवारी दुपारी धडकले आहे. चाकूर तालुक्यातील झरी येथील अमोल शिंदे याच्यासह इतर तरुणांना दिल्लीपोलिसांनी अटक केली असून, त्यांची कसून चाैकशी सुरू आहे. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली येथील विशेष पाेलिस पथक रविवारी झरी गावात दाखल झाले आहे. दिल्ली येथून हे पथक पुण्यात विमानाने आले असून, पुणे ते झरी हा प्रवास त्यांनी वाहनातून केला आहे. चाकूर पोलिस ठाण्यात या विशेष पथकातील अधिकारी रविवारी दुपारी पोहोचले. त्यांनी चाकूर पोलिसांकडून दाेन पोलिस कर्मचारी मदतीसाठी घेतले आहे.

झरी (बु.) गावात ते दुपारी दाखल झाले असून, त्यांच्याकडून अमोल शिंदे याच्या कुटुंबीयांची चाैकशी केली जात आहे. विशेष पाेलिस पथकात पोलिस उपनिरीक्षक, दोन पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. पथकाने वडील धनराज शिंदे आणि आई केशरबाई यांच्याशी अमोलबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पथकातील पाेलिस अधिकाऱ्यांनी हिंदीतून कुटुंबीयांशी संवाद साधला आहे. अमाेलच्या आई-वडिलांना हिंदीतील हा संवाद फारसा समजू शकला नाही, असे केशरबाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अमाेलच्या टी-शर्टवर भगतसिंग यांचे छायाचित्र...
पथकाने अमाेल शिंदे यांच्या घराची झडती घेतली असून, अमोल वापरत असलेला एक टी-शर्ट या पथकाने जप्त केला आहे. त्या टी-शर्टावर शहीद भगतसिंग यांचे छायाचित्र आहे. घरात अमोल याने विविध स्पर्धांत मिळवलेले प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह पथकाने जप्त केले असून, ते त्याने साेबत नेल्याचे आई केशरबाई यांनी सांगितले.

दिल्ली येथील घटनेशी अमाेलचा संबंध नाही...
आम्ही पती-पत्नी, अमोल आणि इतर मुले काबाडकष्ट करून उपजीविका भागवितो. अमोलचा या घटनेशी काहीही संबंध नाही. तो नोकरीसाठी सतत प्रयत्न करत होता. मात्र, त्याला नोकरी लागली नाही, असे दिल्लीच्या विशेष पाेलिस पथकासमोर आई-वडिलांनी कथन केले.

कुटुंबीयांची तासभर पथकाकडून चाैकशी...
या पथकाकडून कुटुंबीयांची जवळपास तासभर चाैकशी करण्यात आली. त्यानंतर झरी येथून हे पथक चाकूरकडे रवाना झाले. चौकशीदरम्यान त्यांनी इतर नागरिकांना आसपास फिरकण्याबाबत मज्जाव केला होता. शिवाय, माध्यमांना छायाचित्र, चित्रीकरण करण्याबाबत त्यांनी परवानगी नाकारली.
 

Web Title: Parliament Security Case Delhi Special Police Squad in Zari village; The family members of the accused were interrogated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.