पुणे रेल्वेला प्रवासी वाढले, सुविधांअभावी होतेय घुसमट
By आशपाक पठाण | Published: November 27, 2023 06:56 PM2023-11-27T18:56:20+5:302023-11-27T18:57:43+5:30
चढताना करावी लागते कसरत, खडी तुडवित जावे लागते डब्यात.
लातूर : हरंगुळ ते पुणेरेल्वेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. मात्र, हरंगुळच्या स्थानकात प्रवाशांना मुलभूत सुविधाही मिळत नसल्याने नाराजीचा सूर आहे. रेल्वेत बसण्यासाठी शेकडो प्रवाशांना खडी तुडवत जीव मुठीत घेऊन चालावे लागते. लहान मुले, महिलांना अक्षरश: इतरांचा आधार घेतल्याशिवाय रेल्वेत चढताही येत नाही. दिव्यांगांना तर मागच्या डब्यात जाताच येत नाही. शिवाय, चालकही खडी तुडवित सीटवर जाऊन बसतो.
जवळपास दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या हरंगुळ ते पुणे रेल्वेला दिवाळीत तर अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. दिवाळीनंतरही प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. बार्शी रोडवर असलेल्या हरंगुळ स्थानकात अचानक रेल्वेने थांबा दिला. याठिकाणी इमारत बांधण्यात आली पण त्यात तांत्रिक कर्मचाऱ्याव्यतिरिक्त एकही व्यक्ती तिथे बसू शकत नाही. एका ठिकाणी प्रवेशद्वारात तिकिट बुकींगची खिडकी आहे. तिथे दहापेक्षा अधिकप्रवासी थांबले की इतरांना आत जाता येत नाही, अशी अवस्था आहे. दुपारच्या वेळी जवळपास दोन ते अडीच तासच याठिकाणी प्रवासी थांबतात, मात्र महिला प्रवाशांची कुचंबना होत आहे.
मागचे तीन, पुढचे चार डबे गैरसोयीचे...
हरंगुळ स्थानकात रेल्वे थांबल्यावर मागचे तीन व पुढचे चार डबे गैरसोयीचे होतात. १५ डब्याची रेल्वे थांबेल एवढा मोठा ट्रॅक (ओटा) नसल्याने रेल्वेत बसण्यासाठी व उतरण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते. महिला, लहान मुलांना इतरांचा आधार घेतल्याशिवाय रेल्वेत बसता येत नाही. बॅग चढविणे, उतरविणे तर अत्यंत धोकादायक आहे. रेल्वेचे चालकांना खडीत तुडवत जावे लागते.
हात, पाय मोडतील रे बाबा...
सोमवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या रेल्वेत बसण्यासाठी प्रवाशांची लगबग होती. यावेळी जवळपास ६५ वर्षीय आजीबाई कुटुंबासोबत पुण्याला निघाल्या होत्या. पाठीमागून दुसऱ्या क्रमांकाच्या डब्यात चढताना त्यांना दोघांनी आधार दिला. रेल्वेत चढताना अपघात झाला तर हात, पाय मोडतील रे बाबा... असे म्हणत आजीबाई रेल्वेत बसल्या.
ट्रॅकची लांबी वाढल्यास धोका टळेल...
रेल्वेस्थानकावर थांब्यासाठी असलेला ट्रॅक (ओटा) अपुरा आहे. या ट्रॅकची लांबी जवळपास अडीचशे ते तीनशे फुट आणखीन वाढविणे गरजेचे आहे. शिवाय, प्रवाशांना किमान मुलभूत सुविधातरी मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. पाणी, बैठक व्यवस्था, शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.