अबब! ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतही झोपविले प्रवाशांना; आरटीओच्या पथकाची भल्या पहाटे कारवाई

By आशपाक पठाण | Published: November 11, 2023 06:12 PM2023-11-11T18:12:39+5:302023-11-11T18:21:17+5:30

दोन दिवसात ८१ ट्रॅव्हल्सवर कारवाई : ५ लाख ३२ हजाराचा केला दंड

Passengers sleeping in the dikki of the travel bus; Early morning action by the RTO team | अबब! ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतही झोपविले प्रवाशांना; आरटीओच्या पथकाची भल्या पहाटे कारवाई

अबब! ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतही झोपविले प्रवाशांना; आरटीओच्या पथकाची भल्या पहाटे कारवाई

लातूर : दिवाळीत खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट, प्रवासात गैरसोय होणार नाही, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने भल्या पहाटे रस्त्यावर येऊन मुंबई, पुण्याहून लातुरात येणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी केली. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात ८१ ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना ५ लाख ३२ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

गर्दीच्या काळात प्रवाशांकडून काही ट्रॅव्हल्सचालक मनमानी प्रवासी भाडे घेत असल्याची ओरड वाढल्याने सतर्क झालेल्या लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बार्शी रोडवर शुक्रवार व शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक वाहन तपासणी मोहिम हाती घेतली. यावेळी पथकाने ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या प्रवाशांना प्रवासी भाड्याच्या संदर्भात विचारपूस केली शिवाय, त्यांच्याकडे असलेल्या तिकिटाचीही पाहणी केली. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, वाहन चालकाचा परवाना, वाहनाचे इन्सुरन्स आदी कागदपत्रांची तपासणी केली. दोन झालेल्या राबविण्यात आलेल्या मोहिमेत एक दोन नव्हे तर तब्बल ८१ ट्रॅव्हल्स विविध प्रकरणात दोषी आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.

डिक्कीत झोपविले प्रवाशांना...
दिवाळीच्या निमित्ताने मुंबई, पुण्याहून लातूरला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक प्रवासी रेल्वे, एस.टी. बस, खाजगी ट्रॅव्हल्स तसेच मिळेल त्या वाहनाने गावाकडे येत आहेत. प्रवाशांची गर्दी वाढल्याने काहीजण प्रवासी भाड्यात तिप्पट वाढत करून आर्थिक लूट करीत असल्याची ओरड वाढल्याने आरटीओच्या पथकाने अचानक तपासणी मोहिम हाती. शुक्रवारी पहाटे पथकाने एका ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत झोपून प्रवास करीत असलेल्या तिघांना बाहेर काढले. धोकादायकरित्या प्रवास करविणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई केली आहे.

प्रवाशांनी तक्रार केल्यास तत्काळ दखल...
दिवाळीत खाजगी ट्रॅव्हल्सना ठरवून दिलेल्या प्रवासी भाड्यापेक्षा अधिकची रक्कम घेणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जात आहे. प्रवाशांनी तिकिटासह आरटीओकडे तक्रार करावी. त्याची तत्काळ दखल घेऊन संबंधितावर कारवाई केली जाईल. यासाठी स्वतंत्रपणे मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी सांगितले.

किरकोळ चुकीलाही दिला जातोय दंड...
आरटीओच पथक भल्या पहाटे रस्त्यावर उतरले असल्याने वाहन तपासणीत किरकोळ चूक आढळून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनाही दंड दिला जाता आहे. दिवाळीत चुकीला माफी नाही, असे धोरण पथकाने राबविल्याचे काही ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. त्यामुळे पहाटेच्या पथकाची चर्चा सुरू आहे. पुण्याहून लातूरला येणारे प्रवासी अधिक असल्याने एक बाजूने रिकामेच जावे लागत आहे. त्यात डिझेलचाही खर्च निघत नसल्याचे सांगण्यात आले.

शनिवारचा दंड ३ लाख ६० हजार..
पहाटेच्या पथकाने शुक्रवारी तपासणी केलेल्या ट्रॅव्हल्समध्ये ३५ वाहने दोषी आढळून आली. त्यांना १ लाख ७२ हजारांचा दंड करण्यात आला. तर शनिवारी ४६ ट्रॅव्हल्सला ३ लाख ६० हजार २०० रूपयांचा दंड करण्यात आला आहे. ज्यादा भाडे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, वाहनांच्या कागदपत्रात दोषी आढळून आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. - आशुतोष बारकुल, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी.

Web Title: Passengers sleeping in the dikki of the travel bus; Early morning action by the RTO team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.