सीमा सुरक्षा दलातील १४७ जवानांचा दीक्षा समारंभ; शानदार सोहळ्यात घेतली देशसेवेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 05:24 PM2022-01-17T17:24:21+5:302022-01-17T17:25:19+5:30
चाकूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झाला कार्यक्रम
चाकूर : येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण केंद्रातील १४७ जवानांचा दीक्षा समारंभ सोमवारी झाला. छत्रपती शिवाजी महाराज परेड मैदानावर एका शानदार कार्यक्रमात या जवानांनी देशसेवेची शपथ घेतली. या परेडची सलामी सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक संजीवकुमार यांनी घेतली. यावेळी सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक प्रवीण राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन चीफ कॉन्स्टेबल पासिंग आउटमध्ये रुजू झाले होते. त्यांना २४ आठवड्यांचे प्रशिक्षण या केंद्रात देण्यात आले. महानिरीक्षक प्रवीण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि द्वितीय कमांड कपिल चौहान यांच्या देखरेखीखाली या प्रशिक्षणादरम्यान या जवानांना शारीरिक क्षमता, शस्त्रास्त्रे, फिल्ड कॅप्टन, नकाशा वाचन आणि फिल्ड इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय अंतर्गत सुरक्षा कर्तव्य, सीमा व्यवस्थापन कायदा आणि मानवाधिकार यावर प्रशिक्षण देण्यात आले.
या नेत्रदीपक परेडचे नेतृत्व नवे मुख्य हवालदार मनोज सिंह यांनी केले. या नवीन मुख्य हवालदारांना आता व्यावसायिक प्रशिक्षणासाठी नवी दिल्ली येथे पाठविले जाणार आहे. त्यानंतर त्यांना भारताच्या विशाल सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात केले जाईल. याप्रसंगी उपमहानिरीक्षक संजीवकुमार यांनी नवनिर्वाचित जवानांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवीन चीफ कॉन्स्टेबल आणि कठोर प्रशिक्षणानंतर ते इतके सक्षम झाले आहेत, ते भारताच्या सीमेवर अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड देत देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शपथविधी सोहळ्याचे आयोजन सहकमांडर उत्तम कांबळे यांनी केले होते.