'लाडकी बहीण'साठी टीसी हवा, तर ४०० रुपयांची लाच द्या; प्रयोगशाळा सहाय्यक अटकेत
By राजकुमार जोंधळे | Published: July 19, 2024 04:25 PM2024-07-19T16:25:37+5:302024-07-19T16:25:37+5:30
एसीबीच्या पथकाने शाळेतच सापळा लावला. लाच घेताना कर्मचाऱ्याला पकडण्यात आले.
देवणी (जि. लातूर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी बहिणीची शाळा साेडल्याचा दाखला काढण्यासाठी शाळेत गेलेल्या भावाकडून ताेगरी येथील प्रयाेगशाळा सहायकाने लाच मागितली. लाच स्विकारताना त्यास कार्यालयात ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी पकडले. याबाबत देवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोगरी (ता. उदगीर) येथेल पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयात तक्रारदाराची बहीण सन २०१२-१३ मध्ये अकरावी, बारावीत होती. दरम्यान, लग्नानंतर ती परभणी जिल्ह्यातील सासरी राहत असून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शाळेच्या दाखल्याची गरज आहे. यासाठी भाऊ शाळेत दाखला काढण्यासाठी गेला. यावेळी प्रयोगशाळा सहाय्यक जयप्रकाश बालाजी बिरादार (वय ४५ रा. उदगीर) याने ४०० रुपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत लातूर येथील एसीबीकडे भावाने तक्रार दाखल केली. मंगळवारी एसीबीच्या पथकाने शाळेतच सापळा लावला. लाच घेताना कर्मचाऱ्याला पकडण्यात आले.