७ व्या वेतन आयोगातील चौथा हप्ता द्या; सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
By हरी मोकाशे | Published: October 2, 2023 05:44 PM2023-10-02T17:44:06+5:302023-10-02T17:44:37+5:30
सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाच्या धोरणावर संताप व्यक्त केला.
लातूर : ७ व्या वेतन आयोगातील चौथा हप्ता तात्काळ देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाच्या धोरणावर संताप व्यक्त केला.
या आंदोलनात लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अण्णाराव भुसणे, के.एस. मानकर, अशोकराव कुलकर्णी, प्रा. के.एस. पोपडे, सुमनताई क्षीरसागर, शिवाजीराव भोसले, शिवाजी कल्याणी, बाबासाहेब सूर्यवंशी, बाबूराव कलमे, भगवान बिरादार, आर.जी. मेठदेवरु, मा.एस. खांडेकर, डी.डी. भोसले, पी.एम. धोंडदेव, बी.एम. हांडे, उध्दव लोंढे, वाय.बी. ठाकूर, जी.एन. बिरादार, एन.एम. जगताप यांच्यासह जवळपास ३५० पेक्षा जास्त सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनास शिवाजीराव साखरे, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष जे. टी. गायकवाड यांनी पाठिंबा दर्शविला.
शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष...
७ व्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता राज्यातील जिल्हा परिषद वगळता अन्य सर्व सेवानिवृत्तांना मिळाला. शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अण्णाराव भुसणे व सचिव के.एस. मानकर यांनी सांगितले. दरम्यान, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच तात्काळ वितरित करण्यात येईल, असे सांगितले.