जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा नागपूर विधान भवनावर पायी 'पेन्शन मार्च'
By संदीप शिंदे | Published: December 15, 2022 05:45 PM2022-12-15T17:45:07+5:302022-12-15T17:45:07+5:30
सेवाग्राम ते नागपूर मार्चमध्ये लातुरातील एक हजार शिक्षक सहभागी होणार
लातूर : १ जानेवारी २००४ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, झारखंड या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही महाराष्ट्रातील सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांच्या वतीने सेवाग्राम ते नागपूर असा पायी पेन्शन मार्च काढण्यात येणार आहे. या पेन्शन मार्चमध्ये लातूर जिल्ह्यातील १ हजार शिक्षक सहभागी होणार आहेत.
राज्यात १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना १९८२-८४ जुनी पेन्शनचे सर्व लाभ बंद करण्यात आले असून, नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर कोणतीही पेन्शन मिळताना दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, इतर चार राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी जुनी पेन्शन संघटना आक्रमक झाली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर पायी पेन्शन मार्च काढण्यात येणार आहे.
यामध्ये २५ डिसेंबर रोजी सेवाग्राम ते बुटीबोरी बाईक रॅली व २६ ते २७ डिसेंबर रोजी बुटीबोरी ते विधान भवन नागपूरपर्यंत पायी पेन्शन मार्च काढण्यात येणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातून एक हजार कर्मचारी सहभागी होणार असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनावर जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी, सहसचिव अरविंद पुलगुर्ले, एस. के. नवले, तुळशीदास धडे, नागनाथ सुरवसे, राहुल रोकडे आदींची नावे आहेत.