सततची नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, देवणी तालुक्यातील बोरोळची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 00:02 IST2021-11-27T00:02:10+5:302021-11-27T00:02:25+5:30
Farmer Suicide News: सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून देवणी तालुक्यातील बोरोळ येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे.

सततची नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, देवणी तालुक्यातील बोरोळची घटना
लातूर - सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून देवणी तालुक्यातील बोरोळ येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. वामन रामकिशन कोयले (३६, रा. बोरोळ, ता. देवणी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, बोरोळ येथील वामन कोयले हे कर्ज आणि सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांची मानसिकता खचली होती. गुरुवारी सकाळी ते घरातून बाहेर पडले आणि स्वतःच्या शेतानजीक असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. विहिरीतील पाण्याचा उपसा करून मयत वामन कोयले यांचा मृतदेह शुक्रवारी विहिरीबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत वामन कोयले यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण, आजी असा परिवार आहे.