पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका अन् किचनमध्ये महागाईचा तडका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:45+5:302021-07-07T04:24:45+5:30
पेट्रोल-डिझेलचे प्रति लिटरचे भाव सातत्याने बदलतात. २०१८ मध्ये पेट्रोल आणि डिझेल ७० ते ८० रुपयांच्या घरात होते. ते आता ...
पेट्रोल-डिझेलचे प्रति लिटरचे भाव सातत्याने बदलतात. २०१८ मध्ये पेट्रोल आणि डिझेल ७० ते ८० रुपयांच्या घरात होते. ते आता शंभरीपार केले आहे. यातून वाहतुकीचा खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्याने वाढले आहेत. ६० रुपये किलो दराने मिळणारा भाजीपाला आता १०० ते १२० रुपयांच्या घरात गेला आहे. खाद्यतेल प्रति किलो ९० ते ९५ रुपयांना मिळत होते. आता ते १५० रुपयांच्या घरात आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे दरही वाढले आहेत. शेती आणि घर खर्चावर होणाऱ्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीचा फटका प्रवासी वाहतुकीलाही बसला आहे. खासगी वाहतूकदारांनी तिकिटांचे दरही वाढविले आहेत.
ट्रॅक्टरची शेतीही महागली
एका एकरावरील नांगरटीला हजार ते बाराशे रुपयांचे डिझेल लागत आहे. दोन वर्षात हजार रुपये एकर नांगरटी दीड हजारांवर पोहोचली आहे. प्रत्येकी सहाशे रुपये एकरी प्रमाणे होणारी पेरणी, मोगडणी अन् पाळी हजारांवर गेली आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया
किराणा मालाची वाहतूक करण्यासाठी आता दीड पटीने भाडे मोजावे लागत आहे. यातून भाववाढ केल्याशिवाय पर्याय नाही. ५० किलोमीटरच्या अंतरात एका तेलाच्या डब्याला १० ऐवजी १५, तर एका क्विंटल साखरेला २० ऐवजी ३० रुपये भाडे मोजावे लागत आहेत. - सतीश जाधव
सध्या दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढीचा फटका प्रत्येक व्यवसायाला बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्यानंतर आपोआप वस्तूंचे भाव वाढतात. याचा भार ग्राहकांना सहन करावा लागतो. - बालाजी कांबळे
पत्ताकोबी ६० रुपये किलो
लातूरच्या भाजी मंडईत दाखल होणाऱ्या भाजीपाल्यांच्या दराने आता शंभरी ओलांडली आहे. प्रति किलो सरासरी ८० ते १२० रुपये किलो दराने भाजीपाला मिळत आहे. पत्ताकोबी ६० रुपये, फुलकोबी ६० रुपये, टोमॅटो २० ते ३० रुपये, शेवगा १००, चवळी १०० रुपये दराने मिळत आहे.
डाळ स्वस्त तर तेल महाग
किराणा मालामध्ये डाळींचे भाव आवाक्यात आहेत; मात्र खाद्यतेल आवाक्याबाहेर गेले आहे. प्रतिकिलो ९५ रुपये असणारे तेल १४५ रुपयांवर गेले आहे.
डाळीमध्ये हरभरा, मसूर डाळ, तूर डाळ, मूग, उडीद प्रति किलो ६० ते ८० रुपयांच्या घरात आहे. डाळींचे दर आवाक्यात असले तरी तेल महागले आहे.
खाद्य तेलाचे भाव दीडपटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरात महागाईची फोडणी द्यावी लागत आहे. यातून आर्थिक नियोजन मात्र कोलमडले आहे.
घर चालविणे झाले कठीण
पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरावर गेले आहेत. यातून जीवनावश्यक वस्तू व भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. दर महिन्याला दोन हजार रुपयांचा किराणा लागत होता. तो आता तीन हजार रुपयांवर गेला आहे. शिवाय, सातशे ते आठशे रुपये भाजीपाल्यासाठी लागत होते. ते आता दीड हजार रुपयांवर गेले आहे. - माधुरी हिंपळनेरकर
इंधनाच्या दरवाढीने महागाईचा फटका सामान्य कुटुंबांना सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अनेक कुटुंबांचा रोजगार गेला आहे. अशा स्थितीत घरप्रपंच चालविणे अवघड झाले आहे. महागाईने अनेकांना अडचणीत आणले आहे. काटकसर करून घरप्रपंच चालवावा लागत आहे. याचा खर्च दीडपटीने वाढला आहे. - मोहिनी उदगीरकर