खिसा कापला पण पैसे बसमध्येच पडले; चोरट्यांसह 'लालपरी' थेट पोलिस ठाण्याच्या दारात!
By राजकुमार जोंधळे | Published: August 10, 2023 07:33 PM2023-08-10T19:33:12+5:302023-08-10T19:36:37+5:30
दोन्ही चोरट्यांना प्रवाशांनी पकडून ठेवले होते.
लातूर : गर्दीचा फायदा घेत पाकिट मारणाऱ्या दोघांचे पितळ उघडे पडल्याने प्रवाशाने उदगीर-पुणे बस थेट लातुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेली. यावेळी पोलिसांनी दोघा पाकिटमाराला अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील उदगीर आगाराची उदगीर-पुणे ही लालपरी लातुरात आल्यानंतर दयानंद गेट येथे प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोघे जण बसमध्ये घुसले. दरम्यान, सेवानिवृत्त असलेले शिक्षक तुळशीदास श्रीहरी उपरे (वय ६८ रा. घारी पुरी, ता. बार्शी जि. सोलापूर) या प्रवाशाचा त्या दोघा पाकिटमारानी ४१ हजार रुपयांचा ब्लेडने खिसा कापला. मात्र, पैसे त्यांच्या हातात न येता ते खाली पडले आणि चोरी उघडी पडली. यावेळी संतप्त झालेल्या प्रवाशांनी आणि वाहकाने तातडीने बसचे आतून दार बंद केले. प्रवाशांनी बस थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले.
या दोघांनाही प्रवाशांनी पकडून ठेवले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता, सोमा अभिनव चौरे आणि बाळू मोहन समुखराव (दोघे रा. राजीव नगर, लातूर) असे नाव सांगितले. हे दोघेही पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार असून, अधिक चौकशीत इतर अन्य गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.