खेळाडू कौशल्यवाढीच्या चेनला लागला ब्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:13+5:302021-04-24T04:19:13+5:30
वार्षिक परीक्षेनंतर जिल्हा क्रीडा कार्यालय, विविध क्रीडा संघटना तसेच विविध क्लब आणि अकॅडमीच्या माध्यमातून दीर्घकालीन उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित ...
वार्षिक परीक्षेनंतर जिल्हा क्रीडा कार्यालय, विविध क्रीडा संघटना तसेच विविध क्लब आणि अकॅडमीच्या माध्यमातून दीर्घकालीन उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिरांतर्गत ३० ते ४० दिवसांचे प्रशिक्षण होत असते. यातून खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेच्या वाढीसह त्या-त्या खेळांच्या कौशल्य वाढीसाठी प्रयत्न केला जातो. या प्रशिक्षण शिबिरातून अनेक खेळाडू आपली कामगिरी उंचावत असतात. वर्षभर खेळण्यायोग्य शारीरिक क्षमता व कौशल्य विकास यातूनच उदयास येत असतो. त्यामुळे अशा प्रशिक्षण शिबिरांची बांधणी अनेक खेळांतून होत असते. कोविड-१९मुळे गतवर्षीही या कालखंडात लॉकडाऊन होते. त्यामुळे ही शिबिरे झाली नाहीत. कशी-बशी गाडी रुळावर येत असतानाच पुन्हा राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे यंदाही नवेदित खेळाडू या शिबिराला मुकणार आहेत. परिणामी, खेळाडूंच्या कौशल्याच्या विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. वर्षभर अभ्यास करावा लागत असल्याने खेळाडूंचा दोन सत्रात नियमित सराव होत नाही. उन्हाळी प्रशिक्षणामुळे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात खेळाडू अधिकाधिक वेळ देऊ शकतात. त्यामुळे अशा शिबिरांना महत्त्व आहे. जिल्ह्यात विविध खेळांच्या खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर आपला ठसा उमटविला आहे. त्यात प्रामुख्याने कुस्ती, व्हॉलीबॉल, बेसबॉल, कब्बडी, खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन, हॅन्डबॉल, बास्केटबॉल, धावणे यांसह अनेक खेळांचा समावेश आहे. मात्र, यंदाच्या वर्षातही उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला खेळाडूंना मुकावे लागणार असल्याने खेळाडू, प्रशिक्षक व पालकांतून चिंता व्यक्त होत आहे.
क्रीडा विभागाचे तीन प्रशिक्षक...
लातूरच्या क्रीडा विभागात क्रिकेट, कुस्ती आणि खो-खो खेळाचे मिळून तीन प्रशिक्षक आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत या तीन खेळांचे दरवर्षी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर होते. मात्र, कोरोनामुळे यंदाच्या वर्षी यावर बंधने आली आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धांच्या खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे.
कोरोनामुळे सरावासाठी अडचण...
संचारबंदीमुळे सध्या घरच्या घरीच व्यायाम सुरू आहे. प्रतिवर्षी उन्हाळ्यात प्रशिक्षण शिबिरे होतात. मात्र, यंदाच्या वर्षात मैदाने बंद असल्याने अडचण झाली आहे. कौशल्य विकास, आत्मविश्वास वाढीसाठी हे शिबिर उपयुक्त असते. मात्र, कोरोनाने यावर पाणी फेरले असल्याचे राष्ट्रीय खेळाडू प्रल्हाद सोमवंशी याने सांगितले.
क्रीडा विकासाची गती संथ होणार...
क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू हा केंद्रबिंदू असतो. खेळाडूंच्या कामगिरीवरच स्पर्धेतील विजेता ठरतो. त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्याला महत्त्व आहे. कौशल्य वाढीसाठी हे शिबिरे महत्त्वाची असून, ही शिबिरे होत नसल्याने क्रीडा विकासाची गती संथ झाली असल्याचे प्रशिक्षक प्रा. आशिष क्षीरसागर म्हणाले.