किनगाव पोलीस वसाहतीची दुरवस्था; कर्मचाऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:05+5:302021-07-22T04:14:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क किनगाव : अहमदपूर तालुक्यातील सर्वात मोठी हद्द किनगाव पोलीस स्थानकाला आहे. या पोलीस ठाण्याची हद्द अहमदपूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील सर्वात मोठी हद्द किनगाव पोलीस स्थानकाला आहे. या पोलीस ठाण्याची हद्द अहमदपूर तालुक्यातील उजनापर्यंत तर रेणापूर तालुक्यात सारोळा-दिवेगावपर्यंत तसेच चाकूर तालुक्यातील नागढाणा गावापर्यंत असून, कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी वसाहत उभारण्यात आली होती. सद्यस्थितीत या वसाहतीची दुरवस्था झाली असून, दारे, खिडक्या मोडकळीस आल्या असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
किनगाव पोलीस ठाण्यांतर्गत ८४ गावे असून, यात अहमदपूर तालुक्यातील ६३, रेणापूर तालुक्यातील ९ आणि चाकूर तालुक्यातील १२ गावे समाविष्ट आहेत. पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस ठाणे परिसरातच लाखो रुपये खर्चून शासकीय निवासस्थाने बांधण्यात आलेली आहेत. परंतु, निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने वसाहतीत कोणीच राहात नसल्याचे चित्र आहे. वसाहतीमध्ये १७ कर्मचारी आणि एक अधिकारी निवासस्थान बांधण्यात आले होते. सद्यस्थितीत या वसाहतीची दुरवस्था झाली असून, दारे-खिडक्या पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. अनेक छतांचा गिलावा गळून पडलेला असून, परिसरामध्ये काटेरी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे याठिकाणी कर्मचाऱ्यांना राहणे मुश्किल झाले असून, एक-दोन कर्मचारी वसाहतीत राहत होते तेही आता जीवाच्या भीतीने आपल्या सोयीप्रमाणे भाड्याने इतरत्र राहत आहेत. प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे ही अवस्था निर्माण झाली असल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत असून, वसाहतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बांधकामाचा प्रस्ताव अधीक्षक कार्यालयाकडे...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पोलीस ठाणे नवीन इमारत बांधकामासाठी सहा कोटी रुपये व नवीन पोलीस वसाहत बांधकामासाठी आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
- आर. के. उबाळे, शाखा अभियंता, अहमदपूर विभाग