प्लाॅटच्या तुकडा बंदीमुळे बजेटमधील घर महागणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:44 AM2021-09-02T04:44:07+5:302021-09-02T04:44:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : शासनाच्यावतीने अकृषिक जमिनीचे तुकडे पाडून खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शासनाच्यावतीने अकृषिक जमिनीचे तुकडे पाडून खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. या संदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नावर परिणाम हाेणार आहे. आवाक्यात असलेल्या बजेटमधील घर महागणार आहे. यासाठी नव्या बदलांचा, अधिनियमातील सुधारणांचा फटका सामान्यांना बसणार आहे. यासाठी पूर्वीच्याच नियमानुसार प्लाॅटच्या खरेदी-विक्रीला परवानगी देण्याची गरज आहे, असे मत बांधकाम व्यवसायातील अनेकांनी व्यक्त केले आहे. तर हा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात २० गुंठ्यांच्या आतील रजिस्ट्री हाेत नाही. २० गुंठ्यांपर्यंतच्या जमिनीला बागायती जमीन म्हणून प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांना आता प्लाॅट खरेदी करायचा आहे, त्यांनी एन. ए. लेआऊटची पाहणी करणे गरजेचे आहे.
काय आहे नवा निर्णय...
अकृषिक जमिनीचे तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे. पूर्वी तुकडा पद्धतीने प्लाॅट, जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार हाेत हाेता. आता एखाद्याला जमिनीचे तुकडे करुन प्लाॅटची विक्री करायची असेल तर नव्या नियामानुसार एनए-लेआऊट करुन घेणे बंधनकारक आहे.
पूर्वीप्रमाणेच परवानगी हवी...
ग्रामीण भागात प्रत्येक जमीन एनए-लेआऊटनुसार खरेदी-विक्री करणे कठीण आहे. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी, नव्या अधिनियमानुसार सुधारणा करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे जाचक ठरणार आहे. यासाठी पूर्वीप्रमाणेच परवानगी हवी.
- विष्णू कांबळे, उदगीर
दीडपानी एनएनुसार अनेकांनी प्लाॅट खरेदी केली आहे. आता त्यांना त्या प्लाॅटला गुंठेवारी करावी लागणार आहे. यासाठी लागणारा खर्च संबंधित प्लाॅटमालकाला करावा लागणार आहे. यातून सामान्यांना फटका बसणार आहे. एखाद्याला प्लाॅट विक्री करायचा तर एनए-लेआऊटनुसारच विक्री करावा लागणार आहे. यासाठी नव्या सुधारणांचा फटका सहन करावा लागणार आहे. - अंगद पाटील किनीकर
काय हाेणार परिणाम...
ग्रामीण भागात पूर्वी तुकडा पद्धतीने प्लाॅट विक्री हाेत हाेती. आता यावर निर्बंध आले आहेत. शिवाय २० गुठ्यांच्या आतील जमिनीची रजिस्ट्री हाेणार नाही. त्यासाठी बागायती प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. शिवाय एनए-लेआऊट महत्त्वाचे आहे.
माेठ्या जागेसाठी पैसा आणणार काेठून...
शासनाच्या नव्या अधिनियमानुसार सुधारणा करण्यात आलेल्या नियमामध्ये छाेट्या-छाेट्या जागेचे व्यवहार आता करणे अवघड आहे. प्रत्येक प्लाॅटच्या खरेदी-विक्रीसाठी आता एनए-लेआऊट आवश्यक आहे. यासाठी माेठ्या जागेसाठी पैसा आणणार काेठून, हा प्रश्न सामान्यांना सतावत आहे.
- अमन गायकवाड, लातूर
प्लाॅटिंगच्या क्षेत्रातील नव्या सुधारणांनुसार आता तुकडा पद्धतीवर निर्बंध आले आहेत. ग्रामीण भागातील प्लाॅटचे व्यवहार आता नियमानुसार, एनए-लेआऊटनुसार करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, २० गुंठ्यांच्या आतील जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार हाेणार नाहीत. त्याचा सामान्यांना फटका बसणार आहे.
- दिगांबर बारसकर, लातूर