खिशे तपासले, पैसे सापडले नाहीत; चिडलेल्या चोरट्याने वृद्धाचा दगडाने ठेचून केला खून
By राजकुमार जोंधळे | Published: March 13, 2023 06:55 PM2023-03-13T18:55:58+5:302023-03-13T18:56:20+5:30
या प्रकरणी आराेपीस अटक करण्यात आली असून ३ दिवसांची काेठडी न्यायालयाने सुनावली आहे
लातूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या गांधी मार्केट काॅम्प्लेक्समध्ये झाेपी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी सकाळी समाेर आली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका आराेपीला अटक केली असून, त्याला लातूर येथील न्यायालयात साेमवारी हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. दाेन दिवसांनंतरही मृत वृद्धाची ओळख पटली नाही. ते पटविण्याचा प्रयत्न पाेलिस करत आहेत.
पाेलिसांनी सांगितले की, लातुरातील गांधी मार्केट काॅम्प्लेक्समधील एका दुकानासमाेर अनाेळखी ५५ ते ६० वर्षीय वृद्ध शनिवारी रात्री झाेपी गेला हाेता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अटकेत असलेला अविनाश धनाजी चव्हाण (वय २३, रा. खाडगाव राेड, लातूर) याने वृद्धाकडे पैसे असतील म्हणून खिशाची तपासणी केली. मात्र, वृद्धाच्या खिशात पैसे आढळून आले नाहीत. शेवटी चिडलेल्या अविनाशने वृद्धाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. खुनाच्या तपासासाठी पाेलिसांनी चक्रे गतिमान करत एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यास पाेलिसी खाक्या दाखविताच आपण हा खून केला असल्याची कबुली दिली. त्याला साेमवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, १५ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
आराेपीने वृद्धाचा चेहरा केला विद्रुप...
खिशात पैसे नसल्याने चिडलेल्या आराेपीने वृद्धाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला आहे. त्यामुळे गेल्या दाेन दिवसांपासून मृतदेहाची ओळख पटली नाही. ती पटविण्याचा प्रयत्न गांधी चाैक ठाण्याचे पाेलिस करत आहेत, अशी माहिती तपासाधिकारी पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे करत आहेत.