सराईत गुन्हेगारांना पाेलिसांचा दणका, ६१ अटकेत;  २६ काेयते जप्त, २८ ठिकाणी नाकाबंदी

By राजकुमार जोंधळे | Published: October 20, 2024 08:01 PM2024-10-20T20:01:05+5:302024-10-20T20:01:48+5:30

लातूर जिल्हाभरात शनिवारी रात्रभर करण्यात आलेल्या नाकाबंदीत वाहनांची माेठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली.

Police action on criminals, 61 arrested;  26 koyta seized, blockade at 28 places | सराईत गुन्हेगारांना पाेलिसांचा दणका, ६१ अटकेत;  २६ काेयते जप्त, २८ ठिकाणी नाकाबंदी

सराईत गुन्हेगारांना पाेलिसांचा दणका, ६१ अटकेत;  २६ काेयते जप्त, २८ ठिकाणी नाकाबंदी

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी रात्रभर काेम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी तब्बल ६१ सराईत गुन्हेगारांची पाेलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये २६ काेयते, कत्ती, धारदार शस्त्र असा मुद्देमाल जप्त केला आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध २८ ठिकाणी पाेलिस पथकांनी नाकाबंदी केली. पाेलिसांनी अचानकपणे केलेल्या कारवाईत दडी मारून बसलेल्या अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. टवाळखाेर, हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना पाेलिसांनी चांगलीच अद्दल घडली आहे.

पाेलिसांनी सांगितले, गत आठवड्यात लातूरसह उदगीर आणि औशात झालेल्या खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची शाेधमाेहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशानुसार लातूर शहरातील गांधी चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी, विवेकानंद चाैक आणि लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यासह जिल्ह्यातील एकूण २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत अचानकपणे नाकाबंदी करण्यात आली. शनिवारी रात्री सुरू करण्यात आलेली काेम्बिंग ऑपरेशन रविवारी पहाटेपर्यंत सुरूच हाेती.

पाेलिस पथकांनी घेतली ६१ गुन्हेगारांची झाडाझडती...

लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी पाेलिस पथकांनी अचानकपणे शाेध माेहीम राबविली. यामध्ये एकूण ६१ सराईत गुन्हेगारांची झडती घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पाेलिसांच्या कारवाईत २६ काेयते, शस्त्र जप्त...

शनिवारी रात्री पाेलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण २६ काेयते, धारदार शस्त्र आणि कत्तीसारखे हत्यार जप्त करण्यात आली आहेत. घरांची झडती घेतली असता, धारदार शस्त्रे आढळून आली आहेत. या गुन्हेगारांना ताब्यात घेत कसून चाैकशी केली जात आहे. ही शस्त्रे कशासाठी आणि काेणत्या कारणासाठी बाळगली? याचीही चाैकशी केली जात आहे.

दारू पिऊन वाहन चालविले; १७ चालकांवर गुन्हे दाखल...

लातूर जिल्हाभरात शनिवारी रात्रभर करण्यात आलेल्या नाकाबंदीत वाहनांची माेठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एकूण १७ चालकांविराेधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे चालक दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आले. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर ‘नजर’

लातूरसह जिल्ह्यातील वाढल्या गुन्हेगारीला राेखण्यासाठी पाेलिसांनी विशेष माेहीम हाती घेतली आहे. खून, चाेरी, दुचाकी चाेरी, घरफाेडीतील गुन्हेगारांचा शाेध घेतला जात आहे, तर त्या-त्या ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर आता पाेलिसांची करडी नजर राहणार आहे. संशयास्पद हालचालींवर नजर ठेवत कारवाई केली जात आहे.

Web Title: Police action on criminals, 61 arrested;  26 koyta seized, blockade at 28 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.