गुन्ह्यात मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच घेणारा पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Published: March 25, 2023 06:48 PM2023-03-25T18:48:57+5:302023-03-25T18:49:10+5:30
तपासामध्ये मदत करताे, यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती
लातूर : औसा पाेलिस ठाण्यात एकाविराेधात आलेल्या ४९८ (अ) च्या तक्रारीमध्ये अटक करणार नाही, तपासामध्ये मदत करण्याच्या कामासाठी ३० हजारांची एका पाेलिस हवालदाराने मागणी केली हाेती. दरम्यान, तडजाेडीअंती १५ हजारांची लाच स्वीकारताना एका पाेलिस हवालदाराला औसा पाेलिस ठाण्यात रात्री रंगेहाथ पकडले. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेतली रात्री अन् गुन्हा दाखल पहाटे, अशी घटना औशात घडली आहे.
औसा पाेलिस ठाण्यात जगन्नाथ लक्ष्मण भंडे हा पाेलिस हवालदार म्हणून कार्यरत हाेता. दरम्यान, ठाण्यात आलेल्या तक्रारीनुसार तुला अटक करणार नाही. शिवाय, तपासामध्ये मदत करताे, यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी संबंधित व्यक्तीकडे केली. तडजाेडीअंती १५ हजार देण्याचे ठरले. मात्र, त्या व्यक्तीने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपतने शुक्रवारी रात्री १० वाजता औसा पाेलिस ठाण्यात सापळा लावला. यावेळी तक्रारदार व्यक्तीकडून कर्तव्यावर असलेला पाेलिस हवालदार जगन्नाथ भंडे याला १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याला लाचेच्या रकमेसह अटक करण्यात आली असून, त्याच्याविराेधात औसा पाेलिस ठाण्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस निरीक्षक भास्कर पुल्ली करीत आहेत.
लातूरच्या पथकाने लावला रात्री सापळा...
हा सापळा नांदेड विभागाचे पाेलिस अधीक्षक डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर एसीबीचे पाेलिस उपाधीक्षक पंंडित रेजितवाड, पाेलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, पाेलिस निरीक्षक अन्वर मुजावर, पाेलिस हवालदार फारुक दामटे, भागवत कटारे, भीमराव आलुरे, श्याम गिरी, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, मंगेश काेंडरे, गजानन जाधव, रूपाली भाेसले, संताेष क्षीरसागर यांच्या पथकाने यशस्वी केला आहे.
मार्चमध्ये अडकले तीन मासे गळाला...
मार्च महिन्यात तीन मासे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये दारु, मटणाच्या मार्टीसाठी अडीच हजाराची लाच स्वीकारताना डायटचा प्राचार्य एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला. त्यापाठाेपाठ महावितरणाचा सहायक अभियंता २२ हजारांची लाच स्वीकारताना गळाला लागला. तर औसा ठाण्यात कर्तव्यावर असलेला पाेलिस हवालदारही रात्रीच्यावेळी जाळ्यात अडकला आहे.