अवैध दारूविक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष; अखेर विशेष पथकाने टाकली धाड, ५ लाखांचा ऐवज जप्त
By हरी मोकाशे | Published: August 18, 2022 02:28 PM2022-08-18T14:28:46+5:302022-08-18T14:29:50+5:30
विशेष पथकाने चार चाकी वाहनांमधून नेणारी दारू केली जप्त
उदगीर (जि. लातूर ): काही दिवसांपासून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री, मटका सुरू होता. या वाढलेल्या अवैध धंद्याला आळा घालावा म्हणुन ग्रामीण भागातील अनेक गावच्या नागरिकांनी वेळोवेळी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केली. परंतु, पोलिसांनी या तक्रारीकडे कानाडोळाच केला. दरम्यान, बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ग्रामीण पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणावर धाड टाकून देशी दारूचे २२ बॉक्स, चारचाकी वाहन जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत ग्रामीण पोलिसांकडून माहिती अशी की , ग्रामीण पोलिसाच्या हद्यीत असलेल्या लोणी मोड येथे एका कृषी अवजारे विक्रीच्या दुकानासमोर देशी दारूचे बॉक्स चारचाकी (एमएच २४ / ८८१४ ) मध्ये घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाचे चार चाकी वाहनांमधून ७३ हजार १२० रुपयांची दारू व ४ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले. अरोपी संदीप वैजनाथ शिंगे (रा. लोहारा, ता . उदगीर) या आरोपीविरुद्ध पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील कर्मचारी प्रशांत सुरेश सुरेंद्र भुजबळ यांच्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .