वाळूमाफियांचा पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 06:56 PM2018-10-01T18:56:04+5:302018-10-01T18:56:34+5:30

गुन्हा दाखल : दर्जी बोरगाव शिवारात घडली घटना

police personnel assaulted by sand mafiya | वाळूमाफियांचा पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

वाळूमाफियांचा पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Next

रेणापूर (जि. लातूर) : ‘तू आमच्या वाळुच्या गाड्या पकडण्यासाठी, महसुलच्या लोकांना मदत करण्यासाठी आला होतास का’ असे विचारत पेट्रोलिंग करून रेणापूरकडे परतणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर दर्जी बोरगाव शिवारात प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सोमवारी सकाळी रेणापूर पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 गुन्ह्याच्या तपासासाठी त्याचबरोबर पेट्रोलिंग करून रेणापूरकडे येणारे रेणापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष गायकवाड यांना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दर्जी बोरगाव शिवारात वाळूमाफियांनी वाटेत अडविले. ‘तू आमच्या वाळूच्या गाड्या पकडण्यासाठी आला होतास का, शिवाय महसूलच्या लोकांना मदत करण्यासाठी आला होतास का’ अशी विचारणा करीत जबर मारहाण केली. यावेळी त्यांच्या अंगावर जीप घालून जिवे मारण्याच्या प्रयत्न झाला. गायकवाड यांनी आपला जीव वाचविण्यासाठी उडी घेतली. 
दरम्यान, सांगवीकडे जाणाऱ्या दुचाकीवरील दोन व्यक्तींनी ही घटना पाहिली. त्यांनी पोलीस कर्मचारी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाळूमाफिया मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी या दोघा व्यक्तींनी सांगवी गावाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती सांगितली. दरम्यान, ग्रामस्थ घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहून वाळूमाफिया जीपसह फरार झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले, पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनीही धाव घेतली.


याबाबत पोलीस कर्मचारी संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ सूर्यवंशी, रामभाऊ सूर्यवंशी (रा. आरजखेडा) याच्यासह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार असून, त्यांच्या अटकेसाठी रेणापूर पोलीस ठाण्याची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली.

Web Title: police personnel assaulted by sand mafiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.