पोलिसांनी दुचाकींसह तिघांना उचलले; आठ गुन्ह्यांचा लागला छडा !
By राजकुमार जोंधळे | Published: November 19, 2022 06:31 PM2022-11-19T18:31:42+5:302022-11-19T18:32:02+5:30
स्थागुशाची कारवाई : चार माेबाइलसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : शहरातील गांधी चाैक, एमआयडीसी आणि जिल्ह्यात रेणापूर, चाकूर पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून माेटारसायकलींची चाेरी करणाऱ्या टाेळीतील तिघांना लातुरात वेगवेगळ्या भागातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने उचलले. त्यांच्याकडून आठ दुचाकी, चार माेबाइल असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आठ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून माेठ्या प्रमाणावर दुचाकी चाेरी, माेबाइल पळविणे, घरफाेडी आणि इतर गुन्ह्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यातील चाेरट्यांचा शाेध घेण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि त्या-त्या पाेलिस ठाण्यांना दिले हाेते. दरम्यान, चाेरट्यांचा शाेध घेत असताना, १८ नाेव्हेंबर राेजी शिवाजीनगर ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चाेरीची दुचाकी घेऊन संशयित आराेपी खाडगाव परिसरात फिरत आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याने दिली.
खबऱ्याच्या टीपने फुटले बिंग...
खबऱ्याने दिलेल्या टीपनुसार एका संशयिताला तातडीने ताब्यात घेतले. अधिक चाैकशी, झाडाझडती घेतली असता त्याने अविनाश धनाजी चव्हाण (वय २३, रा. संभाजीनगर, खाडगाव रोड, लातूर) असे आपले नाव सांगितले. आपल्या साथीदाराच्या मदतीने लातुरात विविध ठिकाणांहून दुचाकी चाेरल्याची कबुली दिली. या माहितीनुसार राहुल बब्रुवान शेंडगे (वय २८, रा. समर्थ सोसायटी, लातूर) आणि महेश देविदास सरवदे (वय २१, रा. भोईगल्ली, लातूर) यालाही ताब्यात घेण्यात आले.
विविध गुन्ह्यांची दिली कबुली...
ताब्यात असलेल्या तिघांची अधिक चाैकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. चाेरीतील आठ दुचाकी, चार मोबाइल असा ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजी नगर हद्दीतून - ३ , एमआयडीसी भागातून - २, रेणापूर - १, चाकूर - १ आणि गांधी चौक पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून १ असे असे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील आरोपींना शिवाजीनगर ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांच्या पथकाने केली कामगिरी...
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल बहुरे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश जाधव, योगेश गायकवाड, तुराब पठाण, राम गवारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रमोद तरडे, नाना भोंग, मोहन सुरवसे, राजेश कंचे, रवी कानगुले, नितीन कठारे, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली आहे.