जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
By संदीप शिंदे | Published: August 30, 2022 06:42 PM2022-08-30T18:42:18+5:302022-08-30T18:42:44+5:30
साकोळ, थेरगाव, शिवपुर आदी ठिकाणी अचानक धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांविरूद्ध धडक कारवाई केली आहे.
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील विविध जुगार अड्ड्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह ४ लाख ६९ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दहाजणांविरूद्ध रविवारी कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या आदेशानुसार शिरूर अनंतपाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम, पोलिस उपनिरीक्षक रोकडे, हाके, नरहरे, शेटकर, कलमे, पुट्टेवाड, अंधुरीकर यांच्या पथकाने तालुक्यातील साकोळ, थेरगाव, शिवपुर आदी ठिकाणी अचानक धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांविरूद्ध धडक कारवाई केली आहे. यावेळी शिवपुर येथे एका हाॅटेलवर धाड टाकून विनोद सूर्यवंशी, अशोक सुर्यवंशी, वसंत चात्रे, संदिपान महाके, गणेश चात्रे सर्व रा.शिवपुर तसेच परमेश्वर माडे, रवींद्र धुमाळ दोघे रा. जोगाळा व शंतनू पाटील रा. हुडगेवाडी या आठजणांना ताब्यात घेण्यात आले.
तसेच थेरगाव येथील वामन शिंदे यांच्या दुकानात मटका जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने अचानक धाड टाकली. तेथील दोन जणांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाॅ दत्तात्र्य तुमकुटे करीत आहेत.