चाकुरात पाेलिसांचा छापा; साडेनऊ किलाे गांजा जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: April 5, 2025 20:55 IST2025-04-05T20:55:00+5:302025-04-05T20:55:20+5:30
एकाला अटक : लातूर स्थागुशाच्या पथकाची कारवाई...

चाकुरात पाेलिसांचा छापा; साडेनऊ किलाे गांजा जप्त
राजकुमार जाेंधळे
लातूर : चाेरट्या मार्गाने गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी दुपारी १२:५० वाजता छापा मारला. यावेळी साडेनऊ किलाे गांजा जप्त केला असून, एकाला अटक केली तर दुसरा आराेपी फरार झाला. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर येथील एक व्यक्ती गांजाची चाेरट्या मार्गाने विक्री करत असल्याची माहिती खबऱ्याने लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. या माहितीच्या आधारे चाकूर येथील एका घरावर शनिवारी दुपारी १२:५० वाजता पाेलिसांनी छापा मारला. यावेळी अनिल शिवाजी सूर्यवंशी (वय ४८, रा. चाकूर) याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता, घरामध्ये खताच्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत बी-मिश्रित ९ किलो ५६५ ग्रॅम गांजा (किंमत १ लाख ९१ हजार ३०० रुपये) आढळला. याबाबत अधिक सखाेल चाैकशी केली असता, हा गांजा अवैध विक्रीसाठी ओम ऊर्फ बाळू भगवान वाघमारे (रा. विवेकानंद चौक, लातूर) याच्याकडून विकत घेतल्याची त्याने कबुली दिली. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला असून, अनिल सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी ओम ऊर्फ बाळू भगवान वाघमारे हा फरार असून, त्याचा पाेलिस पथकांकडून शाेध घेतला जात आहे.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, पोउपनि. संजय भोसले, साहेबराव हाके, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, तानाजी बरुरे, सुधीर कोळसुरे, नानासाहेब भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, रियाज सौदागर, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.