शिवारातील जुगारावर पोलिसांचा छापा; सात जण अडकले जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Published: January 2, 2023 06:59 PM2023-01-02T18:59:36+5:302023-01-02T19:00:01+5:30
पोलिसांनी सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे
लातूर : तालुक्यातील चांडेश्वर शिवारातील एका शेतात सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. यावेळी दहा जणांना पकडण्यात आले असून, जुगाराचे साहित्य,राेख रक्कम आणि वाहने असा एकूण ११ लाख २२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात साेमवारी दहा जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाविराेधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे,डीवायएसपी सुनील गोसावी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली.
या माहितीच्या आधारे चांडेश्वर शिवारात मन्मथ शिवमूर्ती धरणे यांच्या शेतात तिर्रट नावाचा जुगार सुरू हाेता. या जुगारावर पथकाने अचानकपणे छापा मारला. यावेळी सात जणांना पाेलिसांनी पकडले असून,तिघे पळून गेले आहे. यावेळी जुगाराचे साहित्य,राेख रक्कम,वाहने असा एकूण ११ लाख २२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात १२ (अ) मुंबई जुगार कायद्यांन्वये साेमवारी गुन्हा दाखल केला आहे.